नांदेड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरू झाले. २० नोव्हेंबर रोजी इतवारा, वजिराबाद, भाग्यनगर, रामतीर्थ येथील मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकल्या.जिल्ह्यात दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात मटका सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारी केल्या जात आहेत. पोलिसांनी १९ नोव्हेंबरपासून मटका अड्ड्यावर धाडसत्र सुरू केले आहे. जुन्या नांदेडातील खुदबईनगर चौरस्ता येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कल्याण नावाचा मटका चालविला जात होता. या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १६०० रुपयांचा माल जप्त केला. याच ठिकाणी दुसरीकडे चालत असलेल्या एका अड्ड्यावरही पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात शंकर नलगे आणि उपनिरीक्षक विनायक शेळके यांच्या तक्रारीवरुन इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वजिराबाद येथे चिखलवाडी भागात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर २० नोव्हेंबर रोजी धाड टाकण्यात आली. या धाडीत २४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मधुकर अवातिरक यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील भाग्यनगर येथील प्रेमनगर भागातही जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत १ लाख ७० हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाचे उपनिरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिलोली तालुक्यातील रामतीर्थ ठाण्यांतर्गत नरसी-नांदेड रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरही धाड टाकली. या धाडीत ५ हजार ७५० रुपयांचा माल जप्त केला. सहा.पो.नि. अशोक जाधव यांच्या तक्रारीवरुन रामतीर्थ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.धर्माबाद तालुक्यातील बाचेगाव येथे अवैध देशी दारुविक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून २ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पो.हे.कॉ. रमेश निखाते यांच्या तक्रारीवरुन धर्माबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोलीस पथकाच्या वतीने सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून ही मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
नांदेड जिल्ह्यात मटका अड्ड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:06 AM