लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़जिल्हा पोलीस दलाच्या १२ मार्च ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत ६९ शिपाईपदाची भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता़ खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला होता़ त्यानंतर या प्रकरणात पोकॉ नामदेव ढाकणे, एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल साळुंके यांच्यासह ओंकार संजय गुरव, शिवाजी श्रीकृष्ण चेके, आकाश दिलीप वाघमारे, सलीम महमद शेख, समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के , सुमित दिनकर शिंदे ,अब्दुल मुखीद मकसूद अब्दुल आणि संतोष माधवराव तनपुरे अशा १२ जणांना अटक केली होती़ त्यानंतर कृष्णा जाधव रा़सावरखेडभोई ता़दे़राजा, हनुमान भिसाडे रा़ रिसोड जि़वाशिम व रामदास भालेराव रा़बहाद्दरपुरा ताक़ंधार या तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या़ त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाचा शुक्राचार्य टेकाळे यालाही पकडण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४६ लाख रुपये जप्त केले आहेत़ सोमवारी या सर्वांना न्या़सचदेवा यांनी न्यायालयीन कोठडीत पाठविले़ दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांतही गुन्हा नोंदविण्यात आला असून मंगळवारी आरोपींचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिस नांदेडात येणार असल्याची माहिती हाती आली आहे़नांदेड पोलीस भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली असून त्यात हिंगोली येथील राज्य राखीव दलात गैरप्रकार करुन २१ उमेदवार पोलीस सेवेत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे़ जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही ४ उमेदवार अशाच प्रकारे शासकीय सेवेत कार्यरत आहेत़ नांदेड पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आली आहे़
पोलीस भरती घोटाळा : १६ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:13 AM