कॅप्शन : पुराच्या पाण्याखाली दबलेले नांदेड जिल्ह्यातील रस्ते व पूल. नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री अशाेकराव चव्हाण, आमदार अमर राजूरकर, आमदार माेहन हंबर्डे आदी.
नांदेड : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे नांदेड, हिंगाेली, परभणी या तीन जिल्ह्यांतील ५८२ पूल नादुरूस्त झाले आहेत. या पुलांच्या दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार असून त्यानुसार निधीची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिली. तीनही जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर राेजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतीपीके, रस्ते, पूल व घरांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेडचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण येथे दाखल झाले. बुधवारी रात्री त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. गुरुवारी नांदेड शहरासह ग्रामीण भागातही विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. याबाबत माहिती देताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, एकट्या नांदेड जिल्ह्यात सुमारे ५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात असून त्यात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नांदेड, परभणी, हिंगाेली या तीन जिल्ह्यांमध्ये तब्बल ५८२ पूल पुरामुळे नादुरूस्त झाले आहेत. या सर्वच पुलांच्या दुरुस्तीची गरज असली तरी त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे. तीन वर्गवारीमध्ये हे पूल विभागले जातील. त्यानुसार निधीचीही वर्गवारी केली जाईल. पुलांच्या दुरूस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मिळताे का यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अडचण भासल्यास जिल्हा नियाेजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. तीनही जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांवर फाेकस निर्माण करून अपघात हाेणार नाहीत याची काळजी घेत तेथे प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जाणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी इतरही बाबींची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला आमदार माेहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धाेंडगे प्रामुख्याने उपस्थित हाेते.
चाैकट....
महामार्गावरील खड्ड्यांचा आढावा घेण्याचे निर्देश
पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. औरंगाबाद ते नांदेड, नांदेड ते अहमदपूर-लातूर, नांदेड ते हदगाव, देगलूर व पुढील मार्गांवर दुरूस्तीची गरज आहे. त्याचा आढावा घेण्याचे निर्देश महामार्गाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असेही पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चाैकट....
अन् माजी आमदार ओक्साबाेक्सी रडले
मुखेड तालुक्यातील माजी आमदार किसनराव राठाेड यांचा मुलगा व नातू दाेन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामध्ये वाहून गेले. या दाेघांवरही अंत्यसंस्कार पार पडले. गुरूवारी नांदेडचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी माजी आमदार राठाेड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वयाेवृद्ध किसनराव यांना आपले अश्रू अनावर झाले अन् ते ओक्साबाेक्सी रडले. यावेळी मंत्री चव्हाण यांनी त्यांना धीर दिला. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून किसनराव राठाेड यांचे चव्हाण परिवाराशी ऋणानुबंध आहेत.