नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांत अनुदानित घड्याळी तासिकेवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन आठ महिन्यांपासून रखडले आहे.
अनेक महाविद्यालयाने देयके ही सादर केली आहे. नव्यानेच रुजू झालेल्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका रखडलेल्या मानधनासंदर्भात लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी तासिकेवर काम करणाऱ्या प्राध्यापकवर्गातून होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांत तासिका तत्त्वावर नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना गेल्या आठ महिन्यांपासून अद्याप मानधन मिळाले नाही. शिवाय दरमहा मानधनाचा नियमही नावालाच असल्याने प्राध्यापकवर्ग संतप्त झाला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांत अनुदानित तासिका तत्त्वांवर हजारो प्राध्यापक काम करीत आहेत. याबाबत विभागीय सहसंचालक प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही होत नाही. या विभागीय कार्यालयात नव्यानेच सहसंचालिका म्हणून डॉ. मीना ढेंबरे यांनी पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ कार्य क्षेत्रातील सर्व महाविद्यालयाने अनुदानित तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनचे देयके सादर केली आहेत.
१४ नोव्हेंबर २०१८ रोजी तासिका तत्वावर काम करणाऱ्या अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तासिकेत वाढ करून दर महिन्याला (सेवार्थ प्रणालीद्वारे) मानधन देण्याचा आदेश ही नुसता नावालाच ठरला आहे. मागील जून ते जुलै महिन्यापासून सदरील प्राध्यापक विना वेतन काम करीत आहेत. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या अधिकच्या तासिका, पेपर मूल्यांकन, विभागातील सर्व कामाचा व्याप तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या माथी असतो. इतर प्राध्यापकांच्या लाखों रुपयांच्या पगारी शासन लवकर करते मात्र तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापक वर्गावर मात्र कुणीही लक्ष देण्यास तयार नाही़
कुटुंबाचा चरितार्थ चालवावा कसा ?मागील आठ महिन्यांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापक विनापगारी राबत आहेत. दुसरीकडे प्रचंड वाढलेली महागाई ,तासिका घेण्यासाठी रोजचा पेट्रोलचा खर्चही परवडत नाही. प्रशासनाच्या दिरंगाई व दुर्लक्षितपणामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तासिका तत्त्वावरील नियुक्ती म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. - प्रा.डॉ.भारत कचरे,तासिका तत्त्वावरील प्राध्यापक