कासराळी - आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी राखीव ठरलेल्या आणि बिलोली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासराळीत दोनही गटातील टोकाचे मतभेद आणि राजकीय इर्षेने बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच आहे. आगामी ग्राम पंचायतची निवडणूक ठक्करवाड आणि काँग्रेस समर्थक या नेहमीच्या पारंपरिक स्पर्धकांतच होणार हे निश्चित आहे.
माजी आ. गंगाराम ठक्करवाड सरपंचपद भुषविलेल्या कासराळी येथील ग्रामपंचायतीत १३ सदस्य संख्या निर्धारित आहे. गेल्या ३० वर्षापासून सातत्याने ही ग्रामपंचायत ठक्करवाड यांचे पुत्र जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्या ताब्यात आहे. या परिवारातील येथे तीन पिढ्या सरपंचपदावर आरुढ झाल्या .ज्यात ठक्करवाड पितापुत्र व नातू अरविंद ठक्करवाड यांचा यात समावेश आहे.एकहाती असलेल्या सत्तेला कालांतराने ठक्करवाड यांना विरोधकांच्या रोषाचा सामना करावा लागला .परिणामी सदस्यसंख्या घटली .ज्यामुळे काँग्रेसच्या ही ५ सदस्यांचा ग्रामपंचायतीत प्रवेश झाला. त्यात भर म्हणजे आ.ठक्करवाड यांचे नातू माजी सरपंच अरविंद ठक्करवाड यांचा येथे झालेला पराभव .. हा पराभव ठक्करवाड यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता . येथे काँग्रेस समर्थकही मोठ्या संख्येत आहेत. ते ही सातत्याने येथे ठक्करवाड यांना शह देतात. स्थानिक काँग्रेसची असंख्य जुने नेते येथे अडगळीला पडल्याने सेवानिवृत्त तलाठी दत्तात्रय गंदमवाड हे येथील काँग्रेसची १० वर्षापासून बाजू सांभाळत आहे. त्यांच्या सौ. येथील विद्यमान सदस्या आहेत. याशिवाय अन्य एक सदस्य काँग्रेस तर्फे या ग्रामपंचायतीत आहेत. गत सप्ताहात पार पडलेल्या आरक्षण सोडतीत कासराळी ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. अनुसूचित जातीचा येथे पहिल्यांदाच सरपंच होणार असल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला. येथे काही काळ निरुत्साही वातावरण दिसले. अनेकांनी बिनविरोध निवडीचे आडाखे बांधले . मात्र एकूणच येथील परिस्थिती करण्यात येणारे तर्क पाहता गेल्या २५ वर्षापासून येथे या दोन गटांत टोकाचे मतभेद आहे. राजकीय इर्षा येथे बळावली आहे .त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची कुठलीही शक्यता दिसत नाही . येथे निवडणूक ही अटळ आहे. गतपंचवार्षिक निवडणुकीत ठक्करवाड यांच्या बाजूनेच सरपंच झालेल्या माजी जि.प. सदस्य संग्राम हायगले यांच्या सौ. ललिता हायगले अविश्वास ठरावामुळे कमालीच्या दुखावल्या .ठक्करवाड यांच्याबदल रोष आहेच. पुढे दोन्हीकडूनही न्यायालयीन लढे लढण्यात आली. त्यामुळे हायगले हे ही ठक्करवाड यांच्यापासून दुरावले.काँग्रेस जनांस हायगले यांच्या रुपाने मोठी उपलब्धी असू शकते. हायगले यांची सुद्धा ठक्करवाड विरोधक म्हणून छबी आहे. काँग्रेस अल्पसंख्यांकचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख यांचीही युवकांची फळी येथे आहे.त्यामुळे येथील संभाव्य निवडणूक ही बिनविरोध होण्याची सुतराम शक्यता नाही. नेहमीच्याच ठक्करवाड आणि काँग्रेस समर्थकात ही निवडणूक पार पडेल . यात सरशी कुणाची होईल हे आगामी काळच ठरवेल .