नांदेड : अजगर मारून तो ओढत नेतानाची छायाचित्रे व्हॉटस्अॅपवर टाकणे महागात पडले आहे़ याप्रकरणी अजगराला ओढत नेतानाच्या छायाचित्रातील सहा जणांसह हे छायाचित्र पाटनूर ग्रामपंचायत या व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकणाऱ्या एका जणाविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
मुदखेड तालुक्यातील पाटनूर येथील काही जणांकडून पाटनूर ग्रामपंचायत या नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप कार्यरत आहे़ या ग्रुपवर एका जणाने अजगराला मारून त्याला ओढत नेतानाचे छायाचित्र टाकले होते़ या प्रकाराची वनविभागाने स्वत:हून गंभीर दखल घेत सदर छायाचित्रातील सहा जणांसह या घटनेचे फोटो काढून ते व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे़ परमेश्वर दत्ता कोकाटे, सटवाजी लक्ष्मण डुमणे, राजू अर्जुन गायकवाड, पंडित रेशमाजी येळणे, अप्पाराव पांडोजी कोकाटे, रामा बळीराम पतंगे आणि नागोराव मारोती मिरासे अशी अटक केल्या सात जणांची नावे असून हे सर्वजण मुदखेड तालुक्यातील पाटनूर येथील रहिवासी आहेत़
सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचेही वनविभागाने म्हटले आहे़ ही कारवाई उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डी़एस़ पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, सचिव रामपुरे, वनपाल पी़ए़ धोंडगे, बी़ए़ हदकळे आदींनी केली़ अजगर हा वन्यप्राणी वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ भाग २ मधील आहे़ त्यामुळे त्याची हत्या केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपये दंड लागू शकतो असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले़