लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धर्माबाद तालुक्यातील माष्टी, पाटोदा (थडी) व शेळगाव या तीन गावांचा धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समावेश करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे या न्यायालयीन प्रकरणामुळे धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.धर्माबाद येथील संजय पाटील शेळगावकर यांनी ही याचिका दाखल केली होती. उपरोक्त तीन गावे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी दिलेल्या अर्हता दि. ३१ डिसेंबर २०१७ पर्र्यंत कुंडलवाडीमध्ये समाविष्ट होतील. परंतु, नांदेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील ३० जानेवारी २०१८ च्या अधिसूचनेनुसार सदरील गावे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. मात्र या कालावधीत धर्माबाद कृषी उत्पन्न बााजर समितीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे या गावांचा समावेश धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत करता येत नसल्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने माष्टी, पाटोदा (थडी) व शेळगाव ही गावे धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समाविष्ट करावेत, असे आदेश दिले आहेत.त्याचवेळी या तीन गावांतील मतदारांचा मतदारयादीत समावेश करुनच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावीत, असे आदेशही दिले आहेत. परिणामी बुधवारी दुपारी घोषित केलेली धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बुधवारी सायंकाळीच पुढील आदेशापर्यंत स्थगित करावी लागली आहे.---बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मुदखेड समवेत धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम घोषित केला होता. त्याचवेळी कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत समाविष्ट असलेल्या तीन गावांनी धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली. तिचा निर्णय बुधवारी सायंकाळपर्यत येईल असे स्पष्ट केले होते. हा निकाल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कळविण्यात आला.
धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:51 AM