नांदेड : महावितरण कंपनीतील ऑपरेटर्सच्या वेतनामधील तफावतीच्या प्रश्नावर सहा कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. १३ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील वीज वितरणच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे.
महावितरण कंपनीतील ऑपरेटर्सनी वेतनाच्या अनुषंगाने ९ जानेवारी रोजी चारही प्रादेशिक विभाग कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महावितरण संचालक यांच्या पातळीवर बैठक झाली होती. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मकता दाखविली; परंतु, एक महिन्यानंतरही निर्णायक हालचाल दिसत नसल्याने महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरण ऑपरेटर्सच्या मागण्या १७ वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्रत्येक पंचवार्षिक वेतन करार करताना वीज प्रशासन आश्वासन देते, या विषयासाठी एक अनॉमली कमिटी गठित केली जाते. ही समिती १६ वर्षांनंतरही अभ्यास करीत आहे. कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रेशो आणि प्रशासनाची उदासीन भूमिका लक्षात घेतली तर महावितरण प्रशासनाने ऑपरेटरच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.
सध्या वीज कर्मचाऱ्यांना वेतन करार २०२३-२८ची प्रक्रिया सुरू आहे. करारापूर्वी ऑपरेटरांचा प्रश्न सोडवावा, यासाठी महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समिती स्थापन केली आहे. वेतनाच्या प्रश्नाबरोबरच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ विभाजनानंतर ऑपरेटरचे पदोन्नती चॅनल विस्कळीत झाले ते पूर्ववत करावे, उच्च वेतनाचे पद महावितरण कंपनीत निर्माण करावे, ऑपरेटर्स, प्रधान तंत्रज्ञ, मुख्य तंत्रज्ञ यांच्यातील वेतन तफावत दूर करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. सर्व यंत्र चालकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सिद्धार्थ लोखंडे, राजन भानुशाली, सुधाकर जायभाये, डी. बी. बोर्डे, प्रभाकर लहाने, शरीक मसलात आदींनी केले आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी विवेक महाले, शिवाजी शिवनेचरी, राजेश बडनखे, नवनाथ पवार, जालिंदर पांढरे, शेखर खर्डीकर, सतीश भुजबळ, राजेश काळे, सतीश जायले, सुधीर इंगळे आदी प्रयत्न करीत आहेत.