नांदेड परिमंडळात डिसेंबर २०२० अखेर घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांकडे तब्ब्ल ५३५ कोटी ४७ लाख रुपये थकले आहेत. त्याचबरोबर कृषिपंप वीज ग्राहकांकडे ४ हजार १०७ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १०६ कोटी २९ लाख तर पथदिवे वीज ग्राहकांकडे ५१२ कोटी ३९ लाख रुपये अशाप्रकारे एकूण ५ हजार २६६ कोटी २६ लाख रुपये थकीत आहेत. नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे १ हजार ८३८ कोटी ६० लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे १ हजार २५९ कोटी १८ लाख रुपये, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे २ हजार १६८ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत.
वीज देयक भरण्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी वीज बिल भरण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळेच सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार विनंती करूनही चालू देयक व थकबाकी न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्याच्या विविध पर्यायांचा वापर करत वीज बिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.