मास्क, सॅनिटायझरचे वाटप
नांदेड - येथील गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात कोविड लस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. मीनल खतगावकर यांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, बिस्कीट, मिनरल वॉटर देण्यात आले. यासाठी अरुणकुमार काबरा, राजेशसिंह ठाकूर, मन्मथ स्वामी यांनी परिश्रम घेतले.
पाच दुकानांवर कारवाई
कंधार - कंधार शहर व तालुक्यात लॉकडाऊनच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. २७ मार्च रोजी शिराढोण येथे एका पथकाने भेट दिली असता, पाच दुकाने उघडी असल्याचे आढळली. या सर्वांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.
लसीकरणाला सुरुवात
भोकर - प्राथमिक आरोग्य केंद्र किनीअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळगाव (बु.) येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांच्या हस्ते कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. गावातील ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव गायकवाड यांना लस देऊन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉ. शीतल सोनटक्के, आरोग्य सेविका अर्चना जटलावार, आरोग्य सेवक वैभव गोवंदे आदी उपस्थित होते.
किनवटमध्ये अवैध दारू विक्री
किनवट - लॉकडाऊनच्या काळातही किनवट शहर व परिसरात देशी, विदेशी दारूसह तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
समाधान जाधव यांची भेट
वाईबाजार - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास माजी जि.प. उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य समाधान जाधव यांनी भेट देऊन सोयीसुविधांची पाहणी केली. औषधी साठ्यांची माहिती घेतली तसेच रुग्णवाहिकेचीही पाहणी केली.
जिल्हा कार्याध्यक्षपदी गायकवाड
मुखेड - तालुक्यातील मौजे हंगरगा प.क. येथील सामाजिक कार्यकर्ते पी.के. गायकवाड यांची बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली. या निवडीचे जिल्हाध्यक्ष दिगंबर सवई, जिल्हा प्रभारी प्रा. राहुल ऐंगडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना कांबळे, मराठवाडा प्रभारी डी.एन. कोकणे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन वाघमारे, ॲड. अहिले, महेंद्र गोफणे आदींनी स्वागत केले.
कारणे दाखवा नोटीस
कासराळी - बक्षीसपात्र जमिनीच्या फेर प्रकरणात कोंडलापूर येेेथे तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले. याबाबतची तक्रार दिगंबर जाधव यांनी केली होती. तहसीलदार कैलास वाघमारे यांनी यासंदर्भातील नोटीस काढून खुलासा मागविला आहे.
बिलोली परिसरात सर्दी, ताप, खोकला
बिलोली - परिसरात सर्दी, ताप, खोकल्याची साथ पसरली आहे. खासगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी वाढली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य पथक पाठवून उपचार करावेत, अशी मागणी होत आहे. एकीकडे कोरोना लाट सुरू असताना दुसरीकडे सर्दी, ताप, खोकल्याचे वाढलेले रुग्ण चिंतेचा विषय बनला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
हदगाव - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणे दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, या मागणीचे निवेदन २७ मार्च रोजी तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन भाजपाचे माजी शहराध्यक्ष बालाजी कऱ्हाळे यांनी देऊन संबंधिताविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून दीपाली चव्हाण यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
कोविड सेंटरची पाहणी
लोहा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी लोहा येथील कोविड सेंटरला शनिवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणी, वीज, स्वच्छता, भोजन आदीबाबत माहिती घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, राम बोरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल बारी, डॉ. दीपक मोटे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये आदी उपस्थित होते.
वीजपुरवठा केला खंडित
फुलवळ - वीज वितरण कंपनीने फुलवळमधील सर्व डीपीवरील पाणीपुरवठ्यासह शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ लोकांवर आली. भुईमूग, मका, ज्वारी आदींचे पाण्याअभावी नुकसान होत आहे. कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने ही कारवाई केल्याने गोविंद मंगनाळे, रघुनाथ पाकाडे आदी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.