नांदेड : भोकर तालुक्यातील रेणापूरच्या तर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्रतीक्षा अनंत भवरे हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर आकाशाला गवसणी घातली आहे. तिची एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत हवाई सुंदरी (एअर होस्टेस) म्हणून निवड झाली आहे. यामुळे नांदेडकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
अनंत भवरे हे मूळ गाव रेणापूर. ता. भोकर, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. कामाच्या शोधात ते छत्रपती संभाजीनगर येथे गेले आणि तेथेच वास्तव्यास आहेत. कौटुंबिक परिस्थिती साधारण असताना त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले, त्याचे फलित आज त्यांना मिळाले. त्यांच्याप्रमाणेच त्याची मुलेसुद्धा जिद्दी, संघर्षमयी आहेत. मुलांना घडविण्यात प्रतीक्षाच्या आईचा मोठा वाटा आहे.
प्रतीक्षा हिचे इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून तिने बीएसची पदवी मिळवली. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या प्रतीक्षाने बीएस्सीनंतर मुंबई येथील फ्रॅंकीन महाविद्यालयात एअर होस्टेसचा कोर्स पूर्ण केला. दोन वर्षांच्या कोर्सनंतर तिने स्वत: घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर तिची एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपनीने एअर होस्टेस म्हणून निवड केली आहे सुरुवातीला तिला १२ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
२ हजार मुलींतून १४ निवडल्याएअर इंडिया एक्स्प्रेस या कंपनीने देशभरातील २ हजार मुलींमधून १४ मुलींची एअर होस्टेस म्हणून निवड केली. त्यात प्रतीक्षा ११ व्या क्रमांकावर आहे. सध्या १५ जानेवारीपासून दिल्ली येथे प्रशिक्षण सुरू असून तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ती हवाई सुंदरी म्हणून देशांतर्गत काम करणार आहे. सहा महिने देशात नोकरी केल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीने यशमाझ्या मुलीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे, त्यामुळे जीवनाचे फलित झाले. तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गांवर चालण्याचा प्रयत्न केल्यामुळे माझ्या कुटुंबीयांना हा सर्वोच्च आनंदाचा क्षण अनुभवायला मिळत आहे.- अनंत भवरे, प्रतीक्षाचे वडील