पंचायतराज समितीत एकूण ३२ सदस्यांपैकी १८ सदस्य गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी या सदस्यांमध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदेडचे दोन आमदारही या समितीत सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.
२०१६-२०१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्षही नोंदविण्यात आली. पंचायतराज समिती शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतींना भेटी देणार आहे. त्याचवेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची प्रश्नावली क्रमांक २ च्या अनुषंगाने साक्षही होणार आहे. समितीचे सदस्य आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार अंबादास दानवे, विक्रम काळे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, प्रदीप जैसवाल, प्रशांत बंग, मेघना बोर्डीकर, प्रतिभा धानोरकर, रत्नाकर गुट्टे, राहुल नार्वेकर, आदी सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
चौकट--
समितीसाठी लाल गालीचे
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ही समिती दाखल झाली आहे. आतापर्यंतच्या समित्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी मात्र पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाची निवड करण्यात आली आहे. राहण्याच्या व्यवस्थेपासून ते प्रवास व्यवस्थेपर्यंत सर्वच बाबतीत समितीची बडदास्त ठेवण्यात येत आहे.