लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून अद्यापही न सावरलेल्या शेतक-याला शनिवारी रात्री झालेल्या वादळीवारे आणि पावसामुळे मोठा फटका बसला आहे़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत बरसत होता़मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाने मशागतीची कामे आटोपली आहेत़ पेरणीसाठी बियाणे खरेदीची लगबगही सुरु झाली आहे़ त्यातच शनिवारी रात्री वादळीवारे आणि पावसाला सुरुवात झाली़ या वादळी वा-यामुळे अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत़ तालुक्यातील पार्डी म., मालेगाव, लहान, देळूब, कोंढा, भोगाव, पांगरी, कामठा, गणपूर, मेंढला, पिंपळगाव, शेलगाव, दाभड, लहान, शेणी, आंबेगाव, येळेगाव बामणी भागातील केळी उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतक-यांनी केळीची कमी लागवड केली होती़ मोठ्या कष्टाने केळीच्या बागाही उभ्या राहिल्या होत्या़ परंतु, मान्सूनपूर्वच्या तडाख्याने सर्वच मातीमोल झाले़ विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यामुळे नांदेड, लिंबगाव, अर्धापूर, बारड, बा-हाळी आदी परिसरात घरांवरील पत्रे उडून गेली होती़ अनेक घरांच्या भिंतीही पडल्या होत्या़ त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले़ संसारोपयोगी साहित्यही पावसात भिजले होते़
मान्सूनच्या आगमनाला आणखी काही दिवस शिल्लक असून त्यापूर्वीच बसलेल्या तडाख्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे़ लिंबगाव, अर्धापूर परिसरातील आंबा, चिकू यासह इतर फळबागांनाही मोठा फटका बसला आहे़ शेतात आंब्याचा सडा पडला होता़ त्यामुळे फळ उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले़---नांदेड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडितमहावितरणने पावसाळ्यापूर्वी सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी वीजतारांवर पडणा-या झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या़ त्याचबरोबर ज्या ठिकाणी वादळी वा-यामुळे नुकसान होवू शकते़ अशी ठिकाणे शोधून उपाययोजना करण्यात आल्या होत्या़ परंतु, शनिवारी झालेल्या वादळीवारे आणि पावसामुळे महावितरणचे सर्वच दावे फोल ठरले आहेत़ शहरातील वजिराबाद, भाग्यनगर, श्रीनगर, काबरानगर,सप्तगिरी कॉलनी,आनंदनगर,सिडको,जुना मोंढ्यासह शहरातील सर्वच भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ रात्री २ वाजता काही भागांचा वीजपुरवठा सुरु झाला़ तर वाडी व पसिरात सकाळपर्यंत वीजपुरवठा खंडितच होता़---
४० खांब जमीनदोस्तशनिवारी रात्री झालेल्या वादळी वा-यामुळे मालेगाव परिसरातील जवळपास ४० वर विद्युत खांब जमीनदोस्त झाले तर अनेक खांबाच्या तारा तुटल्याने दहा वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे़ विद्युत खांब उभारणे व तारा जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती शाखा अभियंता नितीन माटे यांनी दिली़ मालेगाव परिसरातील मालेगाव, देगाव कु़, उमरी, सावरगाव, कामठा या गावांतील जवळपास ४० च्या वर विद्युत खांब कोसळले तर अनेक खांबावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत़ शनिवारी रात्रीपासून जवळपास १४ गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे़ खाली पडलेले विद्युत खांब व विद्युत तारा जोडण्याचे काम सुरू असल्याचे शाखा अभियंता माटे यांनी सांगितले़ वीज खंडित झाल्यामुळे मालेगाव परिसरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ देगाव कु़, धामधरी, मालेगाव, सावरगाव, उमरी, कामठा व मालेगाव येथील अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेली़ गावातील मोठमोठे झाडेही उन्मळून पडली. अनेकांच्या घरांचीही पडझड झाली़ घरात पावसाचे पाणी शिरून एकच तारांबळ उडाली़ बडूर शिवारातील हिंगणी-दर्यापूर, पोखर्णी, मिनकी, बामणी परिसरात अनेकांच्या घराच्या छतावरील टिनपत्रे उडाली तर काही घरांवरील कौलारु खापरे कोसळली होती़---वादळी वा-यामुळे बॅनर,होर्डिंग्ज कोसळून रस्त्यावरशनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली होती़ त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले अनेक बॅनर, होर्डिंग्ज वा-यामुळे कोसळून रस्त्यावर पडले़ भावसार चौक ते वर्कशॉप रस्त्याच्या कडेला एका इमारतीवर लावण्यात आलेले मोठे बॅनर कोसळले़ सुदैवाने त्यामुळे कोणती हानी झाली नाही़ रविवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर बॅनर आणि होर्डिंग्ज पडल्याचे दिसून आले़ पावसाळ्याच्या काळात तरी, किमान याबाबत महापालिकेने खबरदारी घेणे गरजेचे आहे़---खोदलेल्या रस्त्यात रुतली वाहनेशहरात महापालिकेने ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासाठी अनेक भागांत रस्ते खोदून ठेवले आहेत़ शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाला होता़ त्यामुळे अनेकांची वाहने या रस्त्यात रुतली होती़ कामे पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची डागडुजी न केल्यामुळे नांदेडकरांना मोठा त्रास सहन करावा लागला़ नालेसफाईची कामे योग्यरितीने न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर साचले होते़ छत्रपतीनगर भागात एका संगणकाच्या दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले़