कंधारः जानेवारी २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या जनगणनेची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात ३७७ गट तयार झाले असून मागच्यापेक्षा आता महसुली ७ नवीन गाव-वाडी-तांडयाची भर पडली आहे. प्रशासनाने जोरदार तयारी केली असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात २०२१ च्या जनगणनेची प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे.तालुक्याचा सांकेतिक क्रमांक हा १४ आहे.भूमापनानुसार घराची यादी तयार करून त्याचे गट पाडले जातात.तालुक्यात ३७७ गट तयार आहेत.यानंतर प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती प्रक्रिया होईल.त्या नियुक्त्या करण्यासाठी लगबग चालू असल्याचे चित्र आहे.
मागील २०११ ची जनगणना १२७ गावात झाली होती.२०२१ च्या जनगणनेत सात नवीन महसुली गावाची भर पडली आहे. त्यात पोमातांडा, उदातांडा, नेहरूनगर, जयरामतांडा, दुर्गातांडा, लच्छमातांडा, नरपटवाडी याचा समावेश आहे. गावाची घर यादी सुरूवातीला तयार होईल. प्रत्यक्ष जणगणनेत व्यक्तीचे नांव, स्त्री-पुरूष, घर, शौचालय, इमारत प्रकार ,भौतिक सुविधा आदीच्या नोंदी होतील.
जनगणनेचे साहित्य, मार्गदर्शक पुस्तिका प्राप्त झाल्यानंतर नियुक्त प्रगणक, पर्यवेक्षक आदी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा चॉर्ज अधिकारी व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार तथा सहाय्यक चॉर्ज अधिकारी विजय चव्हाण, लिपिक वर्षा डहाळे-शेंडगे आदीजण जनगणनेची यंत्रणा राबवतील. आगामी महिन्यात सुरु होणाऱ्या जनगणनेची प्राथमिक तयारी झाली असून उर्वरीत यंत्रणा तयार करण्यावर भर दिला जात आहे.