नायगाव बाजार ‐ तालुका प्रशासनाने सोमवारी होणाऱ्या १३ गावांच्या सरपंच,उपसरपंच पदांच्या निवडीची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डी. डी. लोंढे यांनी दिली. नायगाव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येवून नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. आयोगाच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढून ते जाहीर करण्यात आले. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आणि त्याप्रमाणे बरबडा, बेंद्री, रुईबु, हुस्सा, केदारवडगाव, कुंचेली, देगाव, राहेर, अंचोली, घुंगराळा, शेळगाव गौरी, डोंगरगाव, शेळगाव छत्री, ईकळीमाळ, टाकळी बुद्रुक, इज्जतगाव बुद्रुक, अलूवडगाव, मांडणी सालेगाव ,निळेगव्हाण, कोठाळा, कारला तमा, कहाळा खुर्द या २३ गावांच्या सरपंच व उपसरपंचांची निवड ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही निवड करण्यासाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात येणाऱ्या विशेष सभेला उपस्थित राहण्याची लेखी सूचनाही संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात आली असून, ठरल्याप्रमाणे सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम होणार आहे. तालुका प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती लोंढे यांनी दिली.
सरपंच, उपसरपंच पदाची निवडीची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:16 AM