भोकर तालुक्यातील नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्र तसेच निसर्ग उद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, उपवन संरक्षक आर. ए. सातेलीकर, आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, नारवट येथील ७०० एकर जागेपैकी १०० एकर जागेवर पर्यटकांसाठी सोयी सुविधा असलेले निसर्ग पर्यटन उद्यान तसेच बांबू प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. या पर्यटन केंद्रात चांगल्या सुविधा असाव्यात, पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या निसर्ग पर्यटन केंद्राला किती जण भेट देऊ शकतील, त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी उपाय योजना, आदींबाबतही विचार करण्यात यावा. तसेच पर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्र संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पावर चालविण्यात यावे, या उद्यानाच्या ठिकाणी सध्या काही सुविधा करण्यात आल्या आहेत त्या तशाच ठेवून त्यामध्ये आणखी काही चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. नर्सरी, बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी सुविधा केंद्रे, सध्या असलेल्या तलावाची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय बांबू प्रकल्प, कौशल्य विकास विभाग व इको टुरिझम बोर्ड, आदी विभागांचाही सहभाग घेऊन आराखडा तयार करावा. तसेच बांबू प्रशिक्षण केंद्रातील वस्तूंचे विक्री व प्रदर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
निसर्ग पर्यटन उद्यान व बांबू प्रशिक्षण प्रकल्प
प्रस्तावित केंद्रामध्ये बांबू अभ्यागतांसाठी सुविधा केंद्राबरोबरच प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठीही सामान्य सुविधा केंद्राच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच बांबूवरील प्रक्रिया प्रकल्प, डिझाईन सेंटर, बांबूपासून बनणाऱ्या हस्तकला साहित्यासाठी इमारत, नर्सरी, जैवविविधता उद्यान, आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर तलावाचे पुनरुज्जीवन, जॉगिंग ट्रॅक, प्रदर्शन कक्ष, कॅफेटेरिया, खुले सभागृह, विद्यार्थ्यांसाठी व ट्रेकर्ससाठी सुविधा, आदींचाही समावेश पहिल्या टप्प्यात आहे. सुविधा केंद्रात बांबूचा बांधकाम क्षेत्रातील उपयोगासंबंधीचा प्रमाणपत्र वर्ग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, हस्तकला वर्ग, आदी प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.