लोहा ( नांदेड) : तालुक्यातील गोलेगाव येथील डॉ. सुनील रामलिंग स्वामी यांनी यूपीएसी परीक्षेत देशात ३३६ वी रँक मिळवत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. वडील रामलिंग स्वामी हे पुजारी असून, आई घरकाम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलाला शिकविले. मुलानेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अथक परिश्रम घेऊन अत्यंत कठीण अशा यूपीएससी परीक्षेत यशाला गवसणी घातली.
आई-वडिलांनी सुनीलला पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्याची मावशी आशाताई मठपती यांच्याकडे खेडकरवाडी येथे ठेवले. त्यानंतर पाचवी ते दहावीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. दहावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात ४० मार्क मिळाले म्हणून निराश न होता तेथूनच अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले. पुढे अकरावी, बारावीसाठी लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर बीएससी ॲग्रीसाठी लातूर येथे शिक्षणाला सुरुवात केली. सुनीलला शिक्षणासाठी दरमहा १५०० रुपये मिळायचे. त्यानंतर बहीण, भाऊ हे शिकायला असल्यामुळे सुनील स्वामी यांनी खासगी शिकवणीला सुरुवात केली. कुटुंबातील बहीण, भाऊ आई-वडिलांना पैसे पाठवायचे. यातूनच भाऊ वैभव स्वामी हा आयटी इंजिनिअर, तर बहीण सोनू स्वामी ॲग्रीकल्चर श्रेणी एक अधिकार म्हणून बंगळुरू येथे रुजू झाली.
सुनील स्वामी यांनी लातूर येथे खासगी शिकवणी घेत ऑल इंडिया आरसीआरमध्ये ११० रँक मिळून ते झांसी येथे ॲग्री सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यूपीएससी परीक्षेत देशात ३३६ वी रँक मिळविली. एका सामान्य कुटुंबातील मुलगा मोठा अधिकार होणार असल्याने आई-वडिलांसह गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.