- शेख शब्बीर देगलूर: एटीएम केंद्रात वृद्धाला मदतीचा बहाणा करत कार्ड बदलून ८० हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बळीराम रामन्ना रामदिनवार वय 72 वर्ष राहणार पेठअमरापूर गल्ली देगलूर हे वृद्ध इसम 26 ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे 11:45 वाजताच्या दरम्यान शहरातील मोंढा कॉर्नर येथील एसबीआयच्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे उभ्या एका अनोळखी व्यक्ती मदतीचा बहाणा करत पुढे आला. बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड घेऊन त्याने दुसरे एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकत पिन नंबर टाकण्यास सांगितले. मशीनमधून पैसे न आल्याने रामदिनवार यांना मशीनमध्ये पैसे नाहीत, पुन्हा या असे सांगत तेथून निघून गेला.
मात्र, त्याच दिवशी भामट्याने रामदिनवार यांचे एटीएम वापरुन 40 हजार रुपये काढून घेतले. तर दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा 40 हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, दोन दिवसांत तब्बल ८० हजार रुपये खत्यातून कपात झाल्याचा मोबाईलवर मेसेज आल्याने रामदिनवार यांना धक्काच बसला. जवळचे एटीएम तपासले असता ते दुसऱ्याच कोणाच्या नावाचे निघल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी देगलूर पोलीस स्टेशन गाठत रामदिनवार यांनी फिर्याद दिली. दरम्यान, एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बँकांनी एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.