- विशाल सोनटक्के
कोरडवाहू शेतीमुळे मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम आहे. त्यामुळे शेती उत्पादनातून मिळणाऱ्या मोजक्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. मात्र, दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती तसेच इतर वेळी नाईलाजाने या शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. या कर्जापोटीच्या व्याजामुळे शेतकऱ्याभोवती कर्जाचा विळखा वाढत जातो. विशेषत: खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडचणी येत असल्याचे दिसून येते.
सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी तब्बल ५.९४ टक्के शेतकरी हे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न २७ हजारांपेक्षा कमी होते. २१.८७ टक्के शेतकरी हे वार्षिक २७ हजार ते ५० हजार इतके वार्षिक उत्पन्न मिळविणारे होते. तर ५० हजार ते दीड लाख वार्षिक उत्पन्न असतानाही ४९.०७ टक्के शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. १४.३७ टक्के शेतकरी हे वार्षिक दीड ते अडीच लाख उत्पन्न मिळविणारे होते. ७.५० टक्के शेतकरी हे वार्षिक अडीच ते सहा लाख उत्पन्न असलेले होते. १.२५ टक्के शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाखांहून अधिक होते. मात्र, त्यानंतरही या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली.
सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या
शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची वरील आकडेवारी पाहिल्यानंतर सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांच्या आत असल्याचे दिसून येते. अत्यल्प उत्पन्नामुळे शेतीतील नैसर्गिक संकट तसेच कौटुंबिक आजारपण, विवाह सोहळा आणि अन्य इतर कारणांसाठी शेतकऱ्याला कर्जासाठी बँकेकडे जावे लागते. पाठपुरावा केल्यानंतर बँक तसेच इतर वित्तीय संस्थाकडून कर्ज मिळते. मात्र, त्यात पुन्हा एखादी आपत्ती आल्यास आर्थिक कोंडीत सापडलेला हा शेतकरी कर्ज फेडण्याच्या तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो.
काही आकडेवारी २६.५६ टक्के शेतकऱ्यांकडे सहकारी बँकेचे दरडोई ६४ हजार ५६० इतके कर्ज होते. या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर दरडोई ८४ हजार ८०४ म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १३१ टक्के इतके कर्ज होते.
५४.०६ टक्के शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज होते. कर्ज घेतले त्यावेळी ते दरडोई एक लाख २० हजार १३२ इतके होते आत्महत्या केल्यावेळी हेच कर्ज दरडोई एक लाख ४९ हजार ३२ रुपये इतके होते. म्हणजेच, घेतलेल्या कर्जाच्या १२४ टक्के इतके कर्ज झाले होते.
११.५६ टक्के शेतकऱ्यांकडे ग्रामीण बँकांचे कर्ज होते. घेतेवेळी ते दरडोई ८९ हजार १६७ इतके होते. आत्महत्येनंतर हेच कर्ज दरडोई एक लाख १२ हजार ५७ रुपये म्हणजेच घेतल्याच्या १२६ टक्के इतके झाले होते.
८.१२ टक्के शेतकऱ्यांनी स्वयंसहाय्यता व इतर गटाकडून कर्ज घेतले होते. घेतेवेळी ते दरडोई ४५ हजार ९३४ इतके होते ते आत्महत्येनंतर ६८ हजार ४५१ एवढे म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १४९ टक्के इतके झाले होते.
३६.२५ टक्के शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज दरडोई दोन लाख २१ हजार ७०३ एवढे होते. ते कालांतराने तीन लाख २४ हजार ३१ रुपये म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १४६ टक्के इतके झाले होते.
२८.४३ टक्के शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला कर्जरुपाने मित्र आणि नातेवाईक धाऊन आले होते. हे कर्ज दरडोई दोन लाख २१ हजार ८१४ इतके होते. वाढत जावून हे कर्ज दरडोई दोन लाख ७० हजार १८१ म्हणजेच घेतल्याच्या १२५ टक्के इतके झाले होते.