नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत, त्यामुळे रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. परंतु ते भरून काढण्यासाठी यापुढे मालवाहतूक वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचे काम सर्व स्तरावर सुरू आहे तर मुंबईसाठी औरंगाबादऐवजीनांदेड येथून खासगी रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दक्षिण मध रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपींदर सिंघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सिंघ यांनी शुक्रवारी दुपारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन काळात रेल्वे अधिकारी, आरपीएफ, कर्मचारी आणि कुटुंबानी धान्य किट तयार करून त्या कामगार, मजूर आणि गरजूंना वाटप केल्याचे सांगितले. तसेच 12 हजार वॉशेबल मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले. लॉकडाऊन काळात विभागाला जवळपास दीडशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मार्च ते ऑगस्टदरम्यान जवळपास सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यापुढेही किती दिवस रेल्वे सेवा बंद राहील हे सांगता येणे शक्य नाही. या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांसाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे पटरीच्या तांत्रिक कामाबरोबरच रखडलेल्या कामांना वेग दिला आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेचे घटलेले उत्पन्न भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त मालगाड्या चालविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पथकांच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा करण्यात आली आहे. लवकरच नांदेड विभागातून कापूस, हळद, तूर व इतर धान्य परराज्यात पाठविण्यात येणार आहे.
अकोला येथील गुडशेड 1 ऑगस्ट पासून बंद करण्यात आले असून तेथील मालगाड्या नांदेड, औरंगाबाद स्थानकाकडे वळविण्यात येणार असल्याचे सिंघ यांनी सांगितले. तसेच औरंगाबाद येथील मालधक्क्याच्या सपाटीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या मालवाहतूक करण्यासाठी एक साप्ताहिक पार्सल एक्सप्रेस चालविण्यात येत आहे तसेच सचखंड एक्सप्रेस ला एक लगेज डब्बा जोडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशांमध्ये चालविण्यात येत असलेल्या 200 रेल्वे गाडयापैकी नांदेड स्थानकावरून सचखंड एक्सप्रेस नियमितपणे धावत आहे. या गाडीला 34 टक्के प्रवासी मिळत असून दररोज बत्तीस लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे सिंग यांनी सांगितले. मनमाड- परभणी दरम्यान विद्युतीकरनाचे काम टेंडर प्रक्रियेत अडकल्याने त्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले तर पूर्णा अकोला विद्युतीकरण 2022 पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अक्षय ड्रायक्लिनरने नियमितपणे नियमानुसार बिले दाखल केली नाही, त्यामुळे त्यांची बिले रखडल्याचे सिंघ यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांसाठी 30 कोच तयाररेल्वे प्रशासनाने देशात विविध स्थानकात 5 हजार डब्यामध्ये सर्व आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 30 डब्बे हे नांदेड विभागात असून योग्य वेळी कोरोना रुग्णासाठी त्याचा वापर करण्यात येईल. तसेच रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येकवेळी सर्व गाड्या सॅनिटायिझ करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे, असे सिंघ यांनी सांगितले.