नांदेड: वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया अगोदरपासूनच सुरु असून आम्ही दोघेही एकत्रच आहोत. आघाडी करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना उद्याच पत्र देण्यात येणार आहे. आरक्षणावादी आम्ही दोघे एकत्र आल्यास या राज्यात सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली. सोमवारी प्रकाश शेंडगेनांदेडात आले होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय उद्याच घ्यावा असे पत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेंडगे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे. त्यावर शेंडगे म्हणाले, सरकारने ओबीसी समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे स्वताहाला मोठा भाऊ समजणार्या मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागू नये. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे ते आरक्षण टिकविण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्यावर असल्याच्या भावनेतून ते आमच्यासोबत आहेत. दोन्ही आरक्षणवादी पक्ष एकत्र आल्यास आमचेच नेते, आमचेच मंत्रालय आणि आमचीच विधानसभा राहणार आहे. दलित, भटके, ओबीसी एकत्र आल्यास या राज्यात राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. असेही शेंडगे म्हणाले. यावेळी मराठवाडा समन्वयक ॲड.अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे यांची उपस्थिती होती.
आमची चूक आम्हाला कळालीदलित, ओबीसी, भटके एकत्र आलो आहोत. आमची चूक आम्हाला कळाली आहे. प्रस्थापितांना आम्ही आजपर्यंत निवडून दिले. परंतु सत्तेचा वापर करुन आमचेच आरक्षण उद्धवस्त होत असेल तर आमची लढाई मतपेटीतून लढावी लागणार आहे. त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना उद्याच पत्र देण्यात येणार आहे. असेही शेंडगे म्हणाले.