नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बीआरएसची देशभरात व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्रातून आणि त्यातही नांदेड जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील केसीआर यांच्या लागोपाठ दोन सभा झाल्या. त्यानंतर त्यांनी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करून एक प्रकारे मास्टर स्ट्रोक मारला आहे. उभय नेत्यांच्या उपस्थितीत तेलंगणात झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.
तेलंगणातील विकास योजनांची भुरळ महाराष्ट्रातील जनतेला पडत आहे. त्यात शेतकरी आणि सामान्यांसाठी असलेल्या योजनांबरोबरच तेलंगणा दलितबंधू योजना लोकप्रिय झाली आहे. शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज, पाणी, अनुदान अशा विविध नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांबाबत महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करण्यासाठी खास नांदेड जिल्ह्याची निवड केली. नांदेड आणि त्यानंतर लोहा येथे सभा घेऊन के. चंद्रशेखर राव यांनी विद्यमान सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. शेतकरी, कष्टकरी, महिला-विद्यार्थ्यांना योग्य सुविधा द्या, मी महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही, असे आवाहनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले होते.
भारत राष्ट्र समितीचा सीमावर्ती भागात असलेल्या तेलगू भाषिक मतदारांवर डोळा असला तरी, त्यांच्याकडून एकापाठोपाठ एक घेतले जाणारे कार्यक्रम राज्याच्या राजकारणात बदल घडवून आणणारे ठरू शकतात. आजघडीला तरी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपला बीआरएसच्या एन्ट्रीचा परिणाम भोगावा लागेल, असे चित्र आहे. त्यातच आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेलंगणातील भव्य १२५ फूट उंच कांस्यापासून बनविलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे नातू माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरही चर्चा झाली. विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल. आजघडीला वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीत वंचित नको, असा पवित्रा घेतला जात आहे. परिणामी, भविष्यात आणखीन राजकीय खेळी बदलू शकते.
...तर बदलेल महाराष्ट्रातील राजकारणतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्रात अपेक्षित चेहरा अद्याप मिळालेला नाही. तेलंगणातील अराजकीय कार्यक्रमानिमित्त केसीआर आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर एकत्र आले. आजघडीला महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे वाढणारा जनकौल आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून केसीआर यांची तेलंगणात तयार झालेली प्रतिमा पाहता दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका लढविल्या तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडेल, अशा चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) अन् वंचित बहुजन आघाडीचे काय?राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची घडी घट्ट राहावी म्हणून नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, बाजार समित्या आणि इतर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची घडी विस्कटलेली पाहायला मिळत आहे. त्यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्या. परंतु, महाविकास आघाडीत वंचित नको, असा पवित्रा घटक पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे भविष्यात वंचित बीआरएससोबत जाऊ शकते. असे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल.
भोकरमध्ये पॅनलभोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या मैदानात भारत राष्ट्र समिती पहिल्यांदाच उतरली आहे. या भागात तेलगू भाषिक मतदार असल्याने भोकर बाजार समितीत उमेदवार देण्याची हिम्मत बीआरएसने केली. परंतू नांदेड, कुंटूर, नायगाव, हिमायतनगर या चार बाजार समित्यांमध्ये अद्याप बीआरएसचे उमेदवार निश्चित झालेेल नाहीत.