नांदेड : निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. येथे ऑनलाइन काम करायचे ठरविले तर त्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पारंपरिक पिकांना छेद देऊन विकेल तेच पिकेल या मंत्राचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृह येथे ‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी नांदेड जिल्ह्यातून आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. यात सोयाबीन पिकाच्या बियाण्यांपासून ते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा वेळेवर पंचनामा व्हावा व त्यांना शक्य तेवढी शासकीय मदत कशी उपलब्ध करुन देता येईल इथपर्यंत त्यांनी स्वत: मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.
शासनाच्या कृषी क्षेत्रातील निगडीत असलेल्या योजनांची माहिती एकत्रितपणे शेतकऱ्यांना मिळावी व विकेल ते पिकेल या नव्या आत्मविश्वासातून शेतकऱ्यांच्या प्रगतीची द्वारे खुली व्हावीत या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
“विकेल ते पिकेल” या भावनेतून एकसंघ होऊन गटशेतीच्या माध्यमातून, एफपीओच्या माध्यमातून शेतीला आधुनिक व व्यावसायिकतेची जोड दिली तर आपणही कुठे कमी पडणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना दिला. तुम्ही तुमच्या घामातून पिकविलेल्या शेती उत्पादनांना चांगले स्वत:च पॅकेजिंगचे साहित्य वापरुन उत्पादक झाले पाहिजे. जे उत्पादन तुम्ही बाजारपेठेसाठी लागणाऱ्या पॅकेजिंगच्या कौशल्यासह तयार कराल त्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या विक्रीसाठी विविध गटांना विभागून तात्पुरती जागा उपलब्ध करु असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. शेतीशी निगडीत शासनस्तरावर अनेक विभाग आहेत.