नांदेड (प्रतिनिधी) शहरातील गणेशनगर भागात राहणाऱ्या पावडे दाम्पत्यांनी यंदाचा मकरसंक्रातीचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला़ पहाटेच घराबाहेर पडून पावडे दाम्पत्यांनी फुटपाथवर वास्तव्यास असणाऱ्या गोरगरिबांची भेट घेवून त्यांना तिळगुळ दिला़ त्याचबरोबर महिलांना साडी, लेकरांसाठी सोनपापडी अन् खाऊ दिला़
भारतात प्रत्येक सणाला वेगवेगळे महत्व असून आपला देश सणा-वारांचा देश म्हणून ओळखला जातो़ जसजसा काळ बदलत चालला आहे, तसतशा सण-उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत बदल होत आहे़ असाच काहीसा बदल करून विनोद पावडे आणि त्यांच्या पत्नी दिपाली पावडे यांनी मकरसंक्रातीचा सण वेगळ्या उत्साहाने साजरा केला़ बुधवारी पहाटे घरातील पुजाअर्चा आटोपून दिपाली पावडे यांनी आपल्या पतींना सोबत घेवून थेट शहरात ज्या ठिकाणी भटके, गोरगरीब लोक रात्रीला मुक्कामी असतात, असे ठिकाण गाठले़ या ठिकाणी असणाऱ्या गरजू, गरिबांना त्यांच्याकडून अनपेक्षित मिळालेली भेट आनंद देणारी होती़ त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून प्रत्येक महिलेला साडी-चोळी, तिळगुळाचे लाडू अन् सोनपापडी भेट देण्यात आली़ शहरातील शिवाजीनगर, गोकुळनगर, रेल्वेस्थानक, भाग्यनगर, बसस्थानक आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या महिलांना साडी भेट देवून पावडे दाम्पत्यांनी
मकरसंक्रातीचा सण साजरा केला़वाणात दिल्या जाणाऱ्या वस्तूंचे आजकाल महत्व राहिले नाही़ कार्यक्रमावर होणारा खर्च टाळून फुटपाथवरील महिलांना साड्या भेट देवून त्यांच्यासोबत साजरी केलेली मकरसंक्रात आणि त्या महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे हास्य पाहून सदर मकरसंक्रात अविस्मरनिय राहील, अशा भावना दिपाली विनोद पावडे यांनी व्यक्त केली़