नांदेड : लोहा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपात थेट चुरशीचा सामना होत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जाहीर सभामुळे निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोंहचली आहे. शुक्रवारी लोह्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या सभांमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.लोहा नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी चौघेजण रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ५७ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. नगराध्यक्षपद निवडणुकीतून शिवसेना उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे आता थेट काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत रंगली आहे. पालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून १० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक रणधुमाळीत प्रारंभी शिवसेनाही आक्रमक होती. सेनेने नगराध्यक्षासह ११ उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. मात्र अखेरच्या क्षणी ६ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने तेथे शिवसेनेचे केवळ ५ जण रिंगणात उरले आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांनी सर्व १७ जागांवर उमेदवार देऊन प्रचाराची राळ उडवून दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सोनू संगेवार, भाजपाकडून गजानन सूर्यवंशी तर बंडखोर शिवाजी अंबेकर आणि प्रा. धोंडे समर्थक अपक्ष उमेदवार रमेश माळी निवडणूक रिंगणात आहेत. यात काँग्रेस आणि भाजपात थेट सामना होत असला तरी इतर दोन उमेदवार कोणाची किती मते खेचतात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.लोहा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने आपला वचननामा बुधवारी प्रसिद्ध केला. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेत आहे. लोह्याच्या विकासासाठी पालिकेच्या सत्तेच्या चाव्या भाजपाकडे द्या, असे आवाहन पक्षातर्फे केले आहे. दरम्यान, काँग्रेसच्यावतीनेही गुरुवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. लोहा शहराच्या सर्वांगीण विकासाचा शब्द काँग्रेसने दिला असून जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.आजच्या सभा ठरणार निर्णायकप्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेससह भाजपानेही जाहीर सभांचे नियोजन केले आहे. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांची शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता लोहा येथील संत गाडगे महाराज शाळेच्या मैदानावर जंगी सभा होणार आहे. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, आ. बसवराज पाटील, आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, आ. अमिताताई चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. खा. अशोक चव्हाण हे सध्या प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत व्यस्त आहेत. मात्र पालिका निवडणुकीचे महत्व लक्षात घेवून ते अकोला येथून हेलिकॉप्टरने उद्या शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता लोह्यामध्ये दाखल होत आहेत. दुसरीकडे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सायंकाळी ५ वाजता लोहा येथील नळगे विद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा होत आहे. या दोन्ही सभा यशस्वी करण्यासाठी पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. एकूणच निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील दोन दिवसातील घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत.
लोहा नगरपालिकेत प्रचाराची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:35 AM
लोहा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपात थेट चुरशीचा सामना होत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जाहीर सभामुळे निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोंहचली आहे.
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या आज जंगी सभा