लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेवून श्रमदान केले पाहिजे. या कार्यात पाणी फाऊंडेशन मदत करीत असून यामध्ये नागरिकांना योगदान करण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले आहे.शहरातील कलामंदिर परिसरात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पाणी फाऊंडेशन व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला राज्यातील अनेक गावांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यातील तीन तालुक्यांतील ११६ गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये सातारा जिल्ह्यातील वेळू या गावाने स्पर्धेत बाजी मारली. त्यानंतर २०१७ मध्ये राज्यातील ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये झालेल्या स्पर्धेत काकडदरा हे गाव विजेता ठरले. त्यानंतर आता यावर्षी राज्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार ३२ गावांमध्ये ही स्पर्धा घेतली जात असल्याची माहिती डॉ़ अविनाश पोळ यांनी दिली.यावर्षी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ५३ तर लोहा तालुक्यातील ६८ गावे अशा एकूण १२१ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठविले असून या गावांतील जलसंकट दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.दरम्यान, स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ५० लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.यावेळी मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिंगारे, भोकर तालुका समन्वयक अमोल माने व लोहा तालुका समन्वयक सुगंध पळसे यांची उपस्थिती होती.
‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील १२१ गावांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:18 AM