किनवट (जि. नांदेड) : किनवटचे उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल यांनी मंगळवारी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशूवैद्यकीय दवाखाना, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय आदींना अचानक भेटी देऊन पाहणी केली़ सगळीकडे पसरलेली अस्वच्छता, कामांचा निकृष्ट दर्जा, कुलूपबंद ग्रामपंचायत पाहून त्यांचा पाराच चढला़ याकडे दुर्लक्ष केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसह पाच जणांच्या निलंबनाचे प्रस्ताव व पाच जणांचे दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचे प्रस्ताव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी जारी केले़
जि. प. प्राथमिक शाळा गणेशपूर (नवे) येथे गोयल यांनी प्रथम भेट दिली़ भेटीमध्ये पहिली ते चौथीची विद्यार्थी वर्गखोली झाडत होते़ शाळेतील स्वयंपाकघरातील अस्वच्छता त्यांच्या दृष्टीस पडली़ ३० जानेवारीला या शाळेला डिजिटल म्हणून मान्यता मिळाली होती़ शाळेतील संगणक व होम थिएटर बाजूला टाकून देण्यात आल्याचे पाहून ते उद्विग्न झाले़ शाळेतील शिक्षक डी़ एच़ वंजारे, पी़डी़जाधव मुख्यालयी राहात नसल्याने त्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश त्यांनी दिले़
मलकापूर खेर्डा येथील पशूवैद्यकीय दवाखाना बंद होता़ प्रभारी पशूवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत शेवनकर मुख्यालयी राहात नसून सतत गैरहजर राहतात, असे तेथील नागरिकांनी सांगितले़ केंद्राभोवती कमालीची अस्वच्छताही पसरली होती़ शेवनकर यांच्या निलंबनाचा प्रस्तावही पाठविण्याचा आदेश गोयल यांनी यावेळी दिला़ याशिवाय अंगणवाडीही बंद होती़ याच गावातील ग्रामपंचायत कार्यालय बंद होते़ ग्रामसेवक पांचाळ तीन ते चार दिवसांआड गावात येतात, असे गावकऱ्यांनी यावेळी गोयल यांना सांगितले़ मुख्यालयी न राहणे निकृष्ट कामांना पाठीशी घालणे आदींमुळे पांचाळ यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचा आणि त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला. याच गावातील आरोग्य उपकेंद्रही बंद होते़ आरोग्यसेवक डीक़े. जोंधळे, आरोग्यसेविका एसक़े.जांभळे गैरहजर आढळून आल्यानेही त्यांच्याही दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले़
दोन शाळांचे मात्र कौतुकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारेगाव (वरचे) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगड येथील आकर्षक शैक्षणिक वातावरणाचे गोयल यांनी तोंडभरून कौतुक केले़
राजगडच्या ग्रामसेविका म्हणाल्या... घरूनच कारभार चालविते
ग्रामपंचायत राजगड येथील विविध कामेही निकृष्ट दर्जाची होती़ कार्यालय उघडे होते़ ग्रामसेविका एम़एसग़ायके उपस्थित होत्या़ मात्र तपासणीसाठी त्यांच्याकडे एकही अभिलेख नव्हते़ माझ्यासोबत काही नाही, सर्व रजिस्टर मी घरी ठेवले आहे, ग्रामपंचायतीचा कारभार घरूनच चालविते, असे त्यांनी सांगितले़ त्यांच्याही निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचा आदेश गोयल यांनी दिला़ मारेगाव (वरचे) येथील ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद होते़ ग्रामसेविका जे़एस़ निलगीरवार अनधिकृत गैरहजर होत्या़ मनरेगांतर्गत मंजूर विहिरींचे काम मजुरामार्फत न करता ब्लास्टींग करून आणि तेही निकृष्ट दर्जाचे केल्याचे आढळून आले़ ग्रामसेवकाबद्दल ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या़ त्याबद्दल त्यांनाही निलंबित करण्याचे आदेश गोयल यांनी दिले़ किनवट पंचायत समितीलाही गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली़ गटविकास अधिकारी एस़ एऩ धनवे यांच्या कानावर उपरोक्त बाबी टाकल्या़ या कामाकडे आपले कमालीचे दुर्लक्ष आहे, कामांची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी धनवे यांना सुनावले. खुद्द धनवे हे अपडाऊन करतात़ त्यांच्याही दोन वार्षिक वेतनवाढी बंद कराव्यात आणि त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव साईओंमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़ गोयल यांच्या अचानक भेटीने निष्क्रीय कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ राजगड प्राथमिक आरोग्य केंद्रात चारपैकी एकच वैद्यकीय अधिकारी हजर होते़ तीन गैरहजर होते़ औषध निर्माण अधिकारी आणि कनिष्ठ सहायकही गैरहजर होते़ बायोमेट्रिक मशीन बंद होती़ आरोग्य केंद्रात अस्वच्छता होती़ पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते़ वीजपुरवठा नव्हता़ औषधांच्या नोंदी स्टॉक रजिस्टरला घेतल्या नव्हत्या़ मुख्यालयी कोणीच राहत नाही असे दिसून आल्याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ़ भाग्यश्री वाघमारे, डॉ़ व्ही़ आऱ आईटवार व डॉ़ सचिन जामकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव त्यांनी प्रस्तावित केला़ वैद्यकीय अधिकारी डॉ़ मीना लटपटे यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी बंद करण्याचा आदेश दिला़ औषध निर्माण अधिकारी बी़ डी़ सादुलवार यांची पेन्शन कारवाई थांबवण्यात यावी, तसेच कनिष्ठ सहायक सीक़े. कंधारे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश दिला़