कंधार (नांदेड ) : येणाऱ्या काळात तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई भिषण रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दोन टप्प्याचा ९ कोटी ५३ लाख १० हजाराचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
गतवर्षी अपूऱ्या पावसाने, दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर यांना मोठा संघर्ष करावा लागला. २०१८-१९ सालात अपुरा व दिर्घ अंतराने झालेल्या पावसाने व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. यातच आता जलसाठे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मत करण्यासाठी प्रशासनाने दुष्काळी कृती आराखडा तयार केला आहे.
या नुसार पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च- २०१९ या कालावधीत ५ कोटी ५७ लाख ४६ हजार खर्च अपेक्षित आहे. तर एप्रिल ते जून- २०१९ या दुसऱ्या टप्प्यात टँकरवर मोठी मदार राहणार असे संकेत आहेत. टँकरवर २ कोटी ४० लाखाचा खर्च अपेक्षित आहे.