लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त शिक्षकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती़पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत २९ मार्च २००१ चे पती-पत्नी एकत्रिकरण धोरण व २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार ३० किमीपेक्षा जास्त अंतरावरील पती-पत्नींना समान न्याय्य हक्काच्या तत्त्वाने ३० किमीच्या आत दुरुस्तीने पदस्थापना बदलून द्यावी़ गरोदर, स्तनदा माता, विधवा शिक्षिका तसेच डोंगराळ भागात पदस्थापना मिळालेल्या शिक्षिका व युनिट फॉ वुमेन या गावात पदस्थापना मिळालेल्या शिक्षिकांना सुरक्षेच्या कारणावरुन पदस्थापना बदलून द्यावी़ संवर्ग १ ते ३ मधील बोगस शिक्षकांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी, ज्युनिअर, सिनिअरच्या घोळात अन्याय झाला आहे़ त्या एकल शिक्षकांनाही पदस्थापना बदलून द्यावी़ पेसाअंतर्गत दहा, पंधरा वर्षे सेवा करुन परत पेसाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार पदस्थापना द्यावी आदी मागण्या शिक्षकांच्या वतीने करण्यात आल्या़ या मागण्यांवर अद्याप प्रशासनाने कुठलाच निर्णय घेतला नसल्यामुळे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, विस्थापित शिक्षक कृती समितीचे विठ्ठल ताकबिडे, शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष जीवन पा़ वडजे, सुरेश दंडवते, नीळकंठ चोंडे, डी़एम़पांडागळे, दिगंबर कुरे, तसलीम शेख, बी़एस़पांडागळे, संजय कोठाळे, चंद्रकांत कुनके, सुनील मुत्तेपवार, सुशील जैन, भगवान चारवाडीकर, व्यंकट गंदपवाड, बाबूराव फसमल्ले, दिगांबर मांजरमकर, उत्तम शिंदे, विजय गबाळे यांची उपस्थिती होती़