नांदेड - महादेव कोळी जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. परंतु शुक्रवारी दुपारी काही आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी कक्षाबाहेर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असताना, त्यांना धक्काबुक्की करून खाली पाडण्यात आले. या प्रकरणात ५० आंदोलनकर्त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आंदोलनकर्ते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्यासुमारास काही आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कक्षात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी कक्षाबाहेर असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आशा पाडुरंग बिरकलवाड यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तोच महिला आंदोलनकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ढकलून त्यांना खाली पाडले, तर काहीजणांनी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, असे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून परमेश्वर गोणारे, प्रकाश उत्तम सादलवाड, सरस्वती राजू काेंपलवाड, यशोदाबाई अंबादास जिनेवाड, अतुल कोकेवाड, सविता तुकाराम परसेवाड, अंजनाबाई प्रकाश पिटलेवाड, गंगाबाई अप्पाराव चनेबोईनवाड यांच्यासह ५० जणांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महिलेची हरविली होती शुद्धजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात आंदोलन सुरू असताना अचानक एका महिलेची शुद्ध हरविली. त्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. या महिलेला घेऊनच त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.