नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर देगलूर आगाराची बस नांदेडहून प्रवासी घेवून देगलूरकडे निघाली होती. येळी फाट्याजवळ २० ते २५ जणांच्या टोळक्याने बसवर दगडफेक करीत प्रवाशांना खाली उतरविले व बसमध्ये रॉकेल ओतून बस पेटवून दिली. घटना आज दुपारी १ च्या दरम्यान घडली़ घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारीदाखल झाले असून महामार्गावर पोलिस बंदोबस्त वाढला आहे़
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची धग वाढत असताना शनिवारी ही घटना घडली़ नांदेड-हैैदराबाद राज्य महामार्गावरून देगलूर आगाराची बस नांदेडहून देगलूरकडे (क्ऱ एम़एच़२०- बी़एल़ २१७८) प्रवासी घेवून जात असताना येळी फाट्याजवळ २० ते २५ जणांच्या टोळक्यांनी दगडफेक करीत प्रवाशांना खाली उतरविले़ यातील जवळपास ३० प्रवासी बिथरलेल्या अवस्थेत बसमधून उतरून दूर अंतरावर जावून थांबले़ एवढ्यात काहींनी बसमध्ये रॉकेल ओतून बस पेटवून दिली व घोषणाबाजी करत हे टोळके दुचाकीवरून पसार झाल्याची माहिती बस वाहक एम़ए़ मामीलवाड व चालक श्यामसुंदर वाघमारे यांनी दिली़
या टोळक्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़ घटनास्थळी उस्माननगर पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन चिंचोलकर व नांदेड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर दाखल झाले असून पेटवलेली बस रस्तयातच जळत असल्याने सदर मार्ग बंद करून एकेरी मार्ग वाहतूक सुरू असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने त्यांना हटवताना पोलिसांची दमछाक झाली़ यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून महामार्गावर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़