कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन अधिसभेची बैठक पार पडली. या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हसबे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी.एम. खंदारे, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, संचालक डॉ. रवी सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य उपस्थित होते. २६० कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात यावर्षी ४१.४४ कोटी रुपयांची तूट आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या अर्थसंकल्पात ही तूट ४८.६८ कोटी रुपये एवढी होती. म्हणजेच यावर्षी ७.२४ कोटी रुपयांची तूट कमी झाली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च असोसिएशन या योजनेंतर्गत मानधन या शीर्षकांतर्गत मार्चअखेर २० लक्ष उपलब्ध असून, पुढील वर्षासाठी २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी दत्तक योजना’ याकरिता १५ लक्ष, ‘सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर’करिता २५ लक्ष, ‘कुलगुरू साहाय्यता निधी योजने’ करिता १५ लक्ष, ‘विद्यार्थ्यांची कल्याण दत्तक योजना’ याकरिता १५ लक्ष, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षात परदेशी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरिता १० लक्ष, ‘स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकास केंद्रा’करिता २० लक्ष, ‘स्टुडंट्स वेलफेअर अँड अवाॅर्ड स्कीम’ या योजनेंतर्गत २० लक्ष, आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करण्याकरिता १० लाख, एम.फिल., पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रासाठी पेपर वाचन करण्याकरिता १५ लक्ष, ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत २० लक्ष, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक योजनेकरिता ५ लक्ष तर विद्यार्थी विकास विभागांतर्गत पारितोषिक योजना करिता २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण चर्चासत्र परिषद इत्यादींना हजर राहण्यासाठी १० लक्ष, कर्मचारी कल्याण निधीकरिता १५ लक्ष, कोविड-१९ उपाययोजनेकरिता १५ लक्ष, आपात्कालीन व्यवस्थापनासाठी २२ लक्ष, कोविड-१९ उपचारासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अग्रिम ५० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महिला जागृतीविषयक कार्यशाळाकरिता ५ लक्ष तर विद्यापीठात दिव्यांग साहाय्यताअंतर्गत ६.३५ कोटी प्रस्तावित करण्यात आलेले आहे. याबरोबरच विद्यापीठ परिसर सुशोभित करण्याकरिता उद्यान विभागास १०७ लक्षाची तरतूद करण्यात आली आहे.