शेतकऱ्याचा मृत्यू
लोहा - बैलाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी लोहा तालुक्यातील भेंडेगाव येथे घडली. जनार्दन शंकर कोल्हे (वय ७०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातील कामे आटोपून सायंकाळी घराकडे परतत असताना बैलाने मागून त्याला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.
निधी संदर्भात बैठक
माहूर - श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रात विकास निधी संकलनाच्या पूर्वतयारीची बैठक २० डिसेंबर रोजी कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली. यावेळी विभागीय बौद्धीक प्रमुख श्रीमंगले, अभियानप्रमुख शाम बापू महाराज, बाळू महाराज, संजय गिरी महाराज, रमेश महाराज, ऋषिकेष महाराज, धरमसिंग राठोड, ॲड.रमन जायभाये, सुमीत राठोड, विजय आमले, समर त्रिपाठी, नंदकुमार जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हिमालय राऊत यांनी केले.
डीपीची दुरुस्ती
कुंडलवाडी - कुंडलवाडी परिसरातील पाटोदा, संगम येथील रोहीत्र नादुरुस्त झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेवून कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांनी जागेवरच डीपीची दुरुस्ती केली. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा सुरळीत होऊन पंप चालू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यासाठी विठ्ठल गुंडले, लक्ष्मण श्रीरामे, अनिल उसलवार, साईनाथ लोलेवार, बालाजी तळणे, धोंडीबा देवनपल्ले, रजनी तेलकेश्वर, रवि कोनेरवार, मल्लेश माेतकेवार, योगेश, निलेश संगेवार, गोविंद गवळी आदींनीही परिश्रम घेतले.
दारू दुकाने बंद ठेवा
देगलूर - कर्नाटक राज्यातील पाच हजार ७६२ ग्रामपंंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तेथील शासनाने सीमावर्ती भागाच्या पाच कि.मी. अंतरावरील देगलूर तालुक्यातील हणेगाव, मानूर, बिजलवाडी व मुखेड तालुक्यातील हळणी भागातील दारू दुकाने २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे होण्यासाठी मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
पीक कर्जाचे नूतनीकरण
हदगाव - भारतीय स्टेट बँकेच्या तामसा शाखेने १९१ शेतकऱ्यांचे १ कोटी २५ लाखांचे पीक कर्जाचे नूतनीकरण केले. असा उपक्रम राबविणारी तामसा शाखा मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. शाखेअंतर्गत ४० च्या वर गावांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात तामसा, तळेगाव, उमरी, लोहातांडा, कोळगाव, राजवाडी ही गावे निवडली होती. शाखा व्यवस्थापक अमोल देसाई, क्षेत्रीय अधिकारी संतोष चांदोलकर यांनी याकामी परिश्रम घेतले. विभागीय व्यवस्थापक संजय हाडके यांनी २२ डिसेंबर रोजी शाखेला भेट देवून माहिती घेतली व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
वाळूचा ट्रॅक्टर पकडला
माहूर - तालुका प्रशासनाने मदनापूर येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर २४डिसेंबर रोजी दुपारी पकडला. मंडळ अधिकारी सुगावे, पदकोंडे, तलाठी भानुदास काळे, एडलावार यांचा पथकात समावेश होता. तालुक्यात ठिकठिकाणी वाळू उपसा वाढल्याच्या तक्रारी आहेत.
जखमीचा मृत्यू
देगलूर - तालुक्यातील कावलगाव येथील नागनाथ हणमंत जंगेवाड (वय ३२) यांना वेगातील दुचाकीने धडक दिली होती. ही घटना ११ डिसेंबर रोजी बल्लूरफाटा ते कारेगाव मार्गावर घडली होती. जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देगलूर पोलिसांनी नागमणी जंगेवाड यांच्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद घेतली आहे.