मागील वर्षात सप्टेंबर १५ रोजी झालेल्या येथील मोठ्या पावसाने नाल्यातील पाणी नाल्याशेजारील कुंभार गल्ली, महादेव मंदिर परिसरातील घरांत शिरले होते. यामुळे येथे घरांची मोठी पडझड झाली होती.
मुस्तफा अहेमद शेख यांच्या घरातील हाॕटेल व्यवसायासाठी ठेवलेले डाळ, साखर, बेसन आणि मैदा आणि सायलू शिरोळे, लक्ष्मण शिरोळे, परसराम शिरोळे, लालू मेहेत्रे, गंगाधर मेहेत्रे, बळीराम शिरोळे आदींच्या घरांतील डाळ, तांदूळ, ज्वारी आदी संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असूनही तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या जाहीर केलेल्या यादीत या नुकसानग्रस्तांची नावेच आली नाहीत. मुस्तफा शेख यांचे मोठे नुकसान झाले असताना नाव नसणे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवस पाण्यात भिजलेला माल त्यांनी यंत्रणेला दाखवण्यासाठी घरातच ठेवला होता. पाण्यात कुजल्याने दुर्गंधी सुटल्याने त्यांनी फेकून दिला. मात्र, मदतीच्या वेळी ठेंगाच दाखवण्यात आला. अनेकांच्या घरांत पाच फूट पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले होते. यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या भागास भेट दिली. महसूल विभागाने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी एन.एस. मोताळे यांना नियुक्त केले होते. त्यांनी पडलेल्या घरांचे पंचनामे करून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बसले होते. तेथे वस्तीतील अनेकांनी आमचे नुकसान झाले आमचेही पंचनामे करा, अशी संतप्त भूमिका घेतली होती.
दरम्यान नुकसानीच्या पाहणीचा सर्व्हे ग्रामपंचायतीकडून करण्यात येईल, असे सांगून मोताळे यांनी पळता पाय काढला. दरम्यान अनेकांचे ग्रामपंचायतीने सर्व्हे केले. मात्र, अनेकांची नावेच या यादीत आली नसल्याने अनुदान वाटपात पक्षपातीपणा झाल्याचे दिसते.
‘नुकसानग्रस्तांच्या अनुदानासंबंधीचा आरोप हा माझ्यास्तरावरचा नाही. वरिष्ठ आणि पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अहवालावरच ही भरपाई मिळाली. अनुदान थेट नुकसानग्रस्तांच्या खात्यावर पडणार असल्याने खाते क्रमांक जमा केले जात आहेत.
-सचिन आरू (तलाठी, कासराळी)