आरळी : बिलोली तालुक्यातील मौजे आरळी येथे स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त २० रोजी ग्रामस्वच्छता, पालखी मिरवणूक, किर्तन, महाप्रसाद व हरीजागर अशा विविध उपक्रम घेण्यात आले.
तालुक्यातील आरळी येथे मागील अनेक वर्षापासून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त येथील परीट समाज बांधव व ग्रामस्थांच्या विविध उपक्रम पार पडतात. पुण्यतिथीच्या पहाटे येथील परीट बांधवानी गावामध्ये झाडलोट करत गाव परीसर स्वच्छ करुन, ग्राम स्वच्छतेचा संदेश दिला. दुपारी बारा वाजता येथील विठ्ठल मंदिरात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गुलाल उधळण्यात आला. यावेळी भजनी मंडळ, माताभगिनी व पुरुष बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सायंकाळ सत्रात भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. ''''''''गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला'''''''' या भजनाचा गजर करत नगरप्रदक्षिणा केली. यामध्ये लहान गोपाळ मंडळीनी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
पालखी मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्ही र.भ.प.नरसिंग महाराज केरुरकर यांचे कीर्तन झाले. सर्व श्रोत्यांना या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले. तद्नंतरच्या हरीजागर कार्यक्रमाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी परीट बांधव व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.