जनविरोधी सरकारला सत्तेतून बाहेर खेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:37 AM2018-11-11T00:37:53+5:302018-11-11T00:41:11+5:30
राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़ शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़
नांदेड : विश्वासघातकी, जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे़ या राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़
शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ या अभियानांतर्गत प्रभाग क्र.८ मधील अनेक मतदारांच्या घरी जावून त्यांच्या भेटी घेतल्या व पक्षाला मतदानासह भरीव आर्थिक मदत करा, असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंचावर माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, शमीम अब्दुल्ला, विरेंद्रसिंघ गाडीवाले, नजीर अहेमद बाबा, किशोर भवरे, पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, शंकर शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी खा. चव्हाण म्हणाले, युपीए व एनडीए या दोन सरकारची तुलना केली असता, युपीए सरकार कामामध्ये सरस असल्याचे सहज दिसते. युपीएच्या काळात ५ लाख ३० हजार नवीन प्राथमिक शाळा सुरु केल्या आल्या. तर मोदी सरकारने मागील दोन वर्षांत ४३ हजार शाळा बंद केल्या आहेत. शिक्षणावर युपीएच्या काळात ४़५७ टक्के तर एनडीएच्या काळात ३़४ टक्के इतका खर्च झाला आहे़
युपीएने ६० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले़ याचा फायदा देशातील ३ कोटी शेतकºयांना मिळाला़ तर एडीएच्या काळात कर्जमाफी झालीच नाही. युपीएच्या काळात कृषी विकासदर ३़८४ टक्के तर एनडीएच्या काळात केवळ १़८३ टक्के इतका राहिला आहे. ग्रामीण मजुरी वृद्धीदर युपीएच्या काळात १०़६६ टक्के तर एनडीएच्या काळात ३़६ टक्के, युपीएच्या काळात इंदिरा आवास योजनेअंतर्गत २८़६ लाख तर एनडीएच्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १६़६६ लाख घरांचे बांधकाम करण्यात आले.
माजी पालकमंत्री आ़ सावंत म्हणाले, जनतेच्या मुळावर उठलेल्या या सरकारला आता मतदारच कंटाळले असून २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल़ आ. राजूरकर यांनी हे सरकार विश्वास घातकी, जुलमी व भ्रष्ट असल्याचे उदाहरणासह पटवून दिले. २ कोटी युवकांना दरवर्षी रोजगार, महागाईवर नियंत्रण, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख आदी योजना केवळ चुनावी जुमला असल्याचे सांगतानाच दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील अत्याचारामध्ये मोठी वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला असून राफेल खरेदीमध्ये ४० हजार कोटींची दलाली झाल्याचे ते म्हणाले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले विजय येवनकर यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेविका मोहिनी येवनकर, नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, फिरोजभाई, संदिप सोनकांबळे, रुपेश यादव, प्रशांत सोनकांबळे, प्रकाश रोकडे, गोपी मुदीराज, श्रीनिवास भुसेवार, प्रशांत गड्डम, सचिन करवा, अमितकुमार वाघ आदी उपस्थित होते़
काँग्रेसची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवा
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असतानासुद्धा अबकारी कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला नेऊन ठेवले आहेत. हे सरकार सर्वार्थांने जनविरोधी असून या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची आता वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष ते जनसंपर्क असा आंदोलनाचा व अभियानाचा टप्पा पार केला आहे. राज्यातील प्रत्येक घरामध्ये जावून काँग्रेसची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा जनसंपर्क अभियानाचा उद्देश असल्याचे यावेळी खा़ अशोकराव चव्हाण यांनी सांगितले़