नांदेड : राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या बांधकाम, विस्तारीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून १ टक्का व्याजदराने १५ हजार काेटी रूपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काेराेना महामारीमुळे राज्यात शासनाच्या सर्वच विभागांना निधीच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. केवळ ६० टक्के निधीमध्ये काम भागवावे लागत असल्याने विकासाचे अनेक प्रस्ताव बाजूला पडले आहेत. परंतु, रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. उखडलेल्या रस्त्यामुळे अपघात हाेऊन जीवित हानी हाेते. ही बाब लक्षात घेऊन निधीच्या टंचाईमधून सार्वजनिक बांधकाम खात्याने वेगळा मार्ग शाेधला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून १५ हजार काेटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. या कर्जातून राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग असे शेकडाे किलाेमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. अनेक रस्त्यांचा विस्तारही केला जाणार आहे.
३० टक्के शासनाचा वाटा१५ हजार काेटींच्या या कर्जाच्या माध्यमातून राज्यात माेठी कामे केली जाणार आहेत. यातील ७० टक्के निधी हा एशियन डेव्हलपमेंट बँकेचा असेल तर, ३० टक्के वाटा राज्य शासनाचा असणार आहे. विशेष असे, हे कर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून मार्चमध्ये प्रत्यक्ष कार्यादेश जारी केले जाणार आहेत.
दोन राज्य आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठीराज्यात रस्ते व पुलांसाठी निधीची प्रचंड आवश्यकता आहे. मात्र, निधी नाही म्हणून रडत बसण्याऐवजी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्जाचा पर्याय निवडण्यात आला आहे. या माध्यमातून दाेन राज्ये व जिल्ह्यांना जाेडणाऱ्या मार्गांचा विकास केला जाणार आहे.- अशाेक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री