लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. यावेळी तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. या शिक्षकांना पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही मुदत बुधवारी संपली. या विस्थापित शिक्षकांचा प्रश्न दोन दिवसांत निकाली निघणार आहे. दरम्यान, ६३ शिक्षकांच्या बदल्या बदल करण्यात आला असून याबाबतचे आदेश बुधवारी जारी झाले.शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार शाळांच्या पसंती क्रमांकानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ही बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासाठी एनआयसी पुणे यांच्या माध्यमातून प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदलीसाठी शिक्षकांना २० गावांची निवड करण्याचा पर्यायी देण्यात आला होता.मात्र यातून एकही गाव न मिळालेले जिल्ह्यातील तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. यामध्ये अर्धापूर तालुक्यातील ९१, भोकर ३०, बिलोली ३१, देगलूर १०५, धर्माबाद १५, हदगाव ३४, हिमायतनगर २, कंधार ८९, किनवट १६, लोहा १६८, माहूर ८, मुदखेड ९२, मुखेड १४९, नायगाव ६३, नांदेड १५२, उमरी १६ तर नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील ३२ शिक्षकांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती.ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या ते शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर संबंधित अहवाल प्रशासनाला प्राप्त होईल आणि त्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर या विस्थापित शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार होती. मात्र या प्रकारामुळे विस्थापित शिक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. सदर विस्थापित शिक्षकांना ६ जून पर्यंत पुन्हा बदलीसाठीचे फॉर्म भरण्यास सांगण्यात आले होते. ही मुदत बुधवारी संपली. विस्थापितांपैकी बहुतांश शिक्षकांनी पुन्हा बदलीसाठीचे फॉर्म दाखल केले असून आता प्रशासनाच्यावतीने नव्याने विस्थापितांसाठीची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असून येत्या दोन दिवसात विस्थापितांचा हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.---प्रक्रिया : १५ जण पुन्हा विस्थापित२८ मे रोजी आॅनलाईन प्रक्रियेद्वारे ४ हजार ५८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यावेळी १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. यातील ६३ शिक्षकांच्या बदल्यात नव्याने बदल करण्यात आला असून या शिक्षकांना आता नवीन ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शिक्षण विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. तर बुधवारी नव्याने आणखी १५ शिक्षक विस्थापित झाले आहेत. या शिक्षकांना बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बदली फॉर्म भरुन देण्यास सांगण्यात आले होते. या शिक्षकांचाही प्रश्न दोन दिवसांत निकाली काढण्यात येणार आहे.---विस्थापित शिक्षकांनी नव्याने अर्ज दाखल केले आहेत. बदली प्रक्रियेनंतर पुन्हा नव्याने विस्थापित झालेल्या १५ शिक्षकांनाही बुधवार पर्यंत फॉर्म भरण्यास सांगण्यात आले होते. पुढील दोन दिवस विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यात येईल.-प्रशांत दिग्रसकरशिक्षणाधिकारी, नांदेड.
नांदेड जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निघणार निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:59 AM