नरसी- धर्माबाद40 किमीशेख इलियास।बिलोली : तालुक्याच्या जनतेने अनेक खासदार, आमदार, मातब्बर पुढारी घडविले़ मात्र त्यांना जनतेच्या रोजगाराविषयी लक्ष न देता केवळ आपला स्वार्थ साधल्याने बेरोजगारांच्या संख्येत अफाट वाढ झाली आहे. स्थानिक नेत्यांनी सरकारला उद्योग उपलब्ध करुन देण्यासाठी भाग पाडले पाहिजे, असे मत आरळी येथील बजरंग संगेवार यांनी व्यक्त केले़बिलोली तालुक्याला लाल रेतीची नैसर्गिक देण आहे. रेती उपसा चालू झाला की रोजगार मिळतो़ मात्र यंदा रेती उपसा बंद झाल्याने रोजगार मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील असंख्य मजूर हे तेलंगणा राज्यात धानपीक काढणीसाठी जात आहेत़ तर काही पुणे-मुंबईला काम करण्यासाठी गेले असल्याने याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार असल्याचे बोळेगाव येथील माधव कांबळे यांनी सांगितल़ेतालुक्यातील शंकरनगर येथे साखर कारखाना होता़ त्यातून मिळणाऱ्या रोजंदारीतून हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता ; पण स्थानिक पुढाऱ्यांच्या निष्काळजीमुळे सदर कारखाना बंद पडल्याने अनेक कुटुंबांना रोजगाराच्या शोधात गावे सोडावी लागली. स्थानिक आमदार-खासदारांनी लक्ष दिल्यास मजुरांच्या हाताला काम मिळू शकते, असे मत जिगळा येथील शिवाजी पा.जिगळेकर यांनी व्यक्त केले आहे.अर्धापूर बसस्थानक18 किमीयुनूस नदाफ।अर्धापूर : हदगाव तालुक्यातील द्वारकवाडी हे बेचिराख झालेले गाव असून या गावात ८ कुटुंब २२ वर्षांपासून वास्तव करून आहेत़ परंतु या गावातील नागरिकांसाठी शासनाची कोणतीही योजना राबविली गेली नाही़ गावातील लोकांना आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड नाहीत़ या गावातील लोकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जमिनी काढल्या आहेत ; पण त्या जमिनी नावावर करून दिल्या गेल्या नाहीत. या गावाला २२ वर्षांपासून शासनाची कोणतीही योजना मिळाली नसल्याचे द्वारकावाडी ता़ हदगाव येथील रामचंद्र गंगाराम पवार यांनी सांगितले़अर्धापूर येथील बसस्थानकात सोमवारी प्रवाशांसोबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला़शासनाकडून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आमची दुसरी पिढी शेतीपासून दूर जात आहे़ शेती करणे त्यांना परवडत नाही़ शेती मालाला योग्य भाव दिल्यास आमची मुले मन लावून शेती करतील़ शेतकऱ्यांच्या मुलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी शासनाने शेती मालाला योग्य भाव द्यावा़ तसेच बी- बियाणे शासनामार्फत विक्रीस ठेवले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रवासी गणपूर ता़ अर्धापूर येथील बाबूराव मारोतराव बंडाळे यांनी व्यक्त केली़
बेरोजगारी दूर झाली तरच प्रश्न सुटतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:28 AM
गावातील नागरिकांसाठी शासनाची कोणतीही योजना राबविली गेली नाही़
ठळक मुद्देतालुक्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करावेत