राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस व नांदेड वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष बालाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगावकर,कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, सल्लागार चंद्रकांत घाटोळ यांच्या शिष्टमंडळाने राजूरकर यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी राज्यातील असंघटित कामगार असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रलंबित प्रश्न व वृत्तपत्र विक्रेता, असंघटित कामगार अभ्यास समितीने तयार केलेला अहवाल तात्काळ लागू करा या मुद्यावर आ. राजूरकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आ. राजूरकर यांनी आपण विधिमंडळात हे मुद्दे लक्षवेधीद्वारे अवश्य उपस्थित करु, असे आश्वासन दिले. तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता वृत्तपत्र वितरणाचे काम केलेल्या घटकाला फ्रंट लाईन वर्कर म्हणूनही घोषित करावे, कोरोना काळात राज्यात १६५ हून अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांचा बळी गेला आहे. तसेच कोरोनाने हजारो वृत्तपत्र विक्रेते बाधित झाले, परिणामी त्यांच्या कुटुंबाची परवड झाली. अशा कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी राज्य सरकारकडे संघटनेने सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्याचे पवार यांनी सांगितले. याबाबतही आपण जे काही करता येईल ते करू असे आ.राजूरकर म्हणाले.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार - राजूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:14 AM