ऑनलाईन लोकमत
भोकर (जि. नांदेड ), दि. ३० : किनी येथील एसबीआय बँक शाखेत पीकविमा भरण्याच्या रांगेत शनिवारी (दि.२९) चक्कर आल्यानंतर उपचारा दरम्यान रामा लक्ष्मण पोतरे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. परंतु; पोतरे यांच्या नातेवाईकांनी प्रशासन व बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा, कुटुंबास आर्थिक मदतिचे लेखी आश्वासन द्या असे म्हणत शवविच्छेदन रोखून धरले होते. नातेवाईकांनी घेतलेल्या या भुमिकेनंतर आज सकाळी खा.अशोकराव चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृताच्या नातेवाईकांस संवाद साधला यानंतर जवळपास २१ तासानंतर त्यांनी शवविच्छेदनास परवानगी दिली.
यावेळी त्यांनी मृताच्या नातेवाईकास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपयाची मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवला आहे असे सांगितले व जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने त्यांना रोख ५० हजार रुपयांची मदत दिली. यासोबतच घटनेस जबाबदार असलेल्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी भूमिका मांडली. यानंतर नातेवाईकांनी पोतरे यांच्या प्रेताचे २१ तासानंतर शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली.