तालुक्याला इसापूर धरणातून पाणी मिळत असल्याने बागायती क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे. इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. नगदी पिके म्हणून ओळखले जाणारे केळी, हळद, ऊस या पिकांसहित सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, गहू, हरभरा आदींची लागवड केली जाते. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील पिकाच्या उत्पादनात घट होत चालली आहे. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी शंका उपस्थित होत होती. मात्र, मागील आठवड्यापासून थंडीत वाढ झाल्याने रबी हंगामातील पिके जोमात दिसत आहेत. आणखी अशीच थंडीची लाट कायम राहिली, तर गहू आणि हरभरा पिकांतून भरपूर उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदा अर्धापूर तालुका आणि इसापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने इसापूर धरणात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे, तर तालुका परिसरात नदी, नाले, विहीर आणि बोअरवेल पाण्याने तुडुंब भरली आहेत. यंदा तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. इसापूर धरणातून पाणी पाळ्या मिळण्यास सुरुवात झाली आहे पहिली पाणी पाळी पिकांना मिळाली आहे पाणी भरपूर आहे; परंतु निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके निसर्गाने हिरावून घेतली. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढतील, अशी अपेक्षा आहे; परंतु ढगाळ वातावरणामुळे रबी पिकांना फटका बसतो की काय? असे असताना मागील काही दिवसांपासून थंडीच्या लाटेमुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.