बारूळ कृषी मंडळात उस्माननगर व बारूळ असे दोन महसूल येतात. एकूण लागवडीलायक क्षेत्र १९८०० हेक्टर असून त्यापैकी रबी हंगाम पाच हजार १३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा, गव्हाचे क्षेत्र आहे. या रबीमध्ये हळद ६९८ हेक्टर, तर ऊस ६० हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. उसाचे क्षेत्र हे पाचशे हेक्टरपर्यंत जुना व खोडवा, असे क्षेत्र झाले आहे. यावर्षी शासनाकडून हरभरा अभियानासाठी अनुदानावर उपलब्ध २५०० रुपये प्रति क्विंटल पेरणीसाठी हरभरा देण्यात आला होता. या दृष्टिकोनातून हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असल्याची माहिती बारूळ कृषी मंडळाचे मंडळ अधिकारी आर. एम. भुरे यांनी दिली.
दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र हे खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरीदेखील पेरणीसाठी नियोजन करतात. यंदा १९ हजार ८०० हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने योग्यवेळी हजेरी लावल्याने पिकेदेखील जोमात आली. मात्र, सोयाबीन कापूस ज्वारी पिके फळधारणाच्या अवस्थेतच असतानाच बदलत्या वातावरणाचा फटका या पिकांना बसला. दरम्यान पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले तलाव धरणे विहिरी उसळून भरल्या सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसाने देखील पाणी पातळी आणखीन वाढ झाली. या पावसाचा फटका आहे. ऐन सोंगणीसाठी आलेल्या पिकांना बसला त्यामुळे लागवड केलेले खर्चही निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रबीतील भरून काढू, अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी रबीची तयारी केली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून शासकीय अनुदानावर हरभरा बियाणेदेखील वाटप करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रबीच्या पेरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारूळ कृषी मंडळातील ४३ गावांत ५१३५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, करडी, ज्वारी, चारा पिके घेतली आहेत. पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.