नांदेड : शहरातील मालेगाव राेड व परिसरात नगर काॅलन्यांमध्ये राेडराेमिओ, मद्यपींचा प्रचंड धुमाकूळ आहे. या टवाळखाेरांना तत्काळ आवरा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी शुक्रवारी जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेद शेवाळे यांना दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या या आदेशाची तातडीने दखल घेत एसपींनी सायंकाळीच मालेगाव परिसरात कारवाईसाठी पाेलीस पथके तैनात केली.
‘राेडराेमिओ, मद्यपींना आवरा हाे’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या राेमिओंचा मालेगाव राेड व परिसरामध्ये कसा धुडगूस चालताे, त्याचा महिला, मुली, व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांना कसा त्रास हाेताे याचा लेखाजाेखा वृत्तातून मांडण्यात आला. या संबंधीचे निवेदन २० सप्टेंबर राेजी जिल्हा पाेलीस अधीक्षकांना देण्यात आले हाेते. या वृत्ताची लगेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी दखल घेतली व एसपींना तातडीने याेग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी सायंकाळपासूनच मालेगाव राेड व परिसरात पाेलीस पथके पाठविण्यात आली. त्या भागात सायंकाळी गस्त वाढविण्याची ग्वाहीही पाेलिसांकडून पालकमंत्र्यांना देण्यात आली.
मालेगाव राेड, गजानन मंदिर राेड, कॅनाॅल राेड, तथागत नगर, सरपंच नगर, भावसार चाैक ते शास्त्रीनगर, भावसार चाैक ते मंत्रीनगर राेड व मालेगाव राेडवर सायंकाळी राेडराेमिओ व मद्यपी उच्छाद मांडतात. भाग्यनगर पाेलिसांच्या नाकावर टिच्चून टवाळखाेरांचे हे टाेळके नागरिकांना त्रस्त करतात. व्यावसायिकांना वस्तू खरेदीचे पैसे देत नाहीत, त्यांना हप्त्याची मागणी करतात. भाग्यनगर पाेलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार राजराेसपणे अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या भागातून सायंकाळी कुणीही सुरक्षित फिरू शकत नाही, अशा स्वरूपाच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.