नांदेड : मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाकडूनकाँग्रेसवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप होत होते़ या आरोपांची उत्तरे देताना काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून आले होते़ नेमकी तशीच परिस्थिती आता भाजपाची झाली आहे़ राफेल विमान खरेदीचा मुद्दा अगदी संसदेपासून गावखेड्यापर्यंत चर्चेत आहे़ त्यातच सोमवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने याच मुद्यावरुन निदर्शने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्यांना नांदेडमध्ये येऊन या विषयावर सारवासारव करावी लागली़ काँग्रेसकडे मुद्देच नसल्याने ते विनाकारण राफेलचा मुद्दा चर्चेत आणत असल्याचे भाजपाचे म्हणणे होते़राफेलबाबत काँग्रेसकडून वस्तुस्थितीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्यात येत आहे़ काँग्रेसजवळ मोदी सरकारच्या विरोधात मुद्दाच नसल्यामुळे राजकीय स्वार्थासाठी राफेलबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला़पत्रपरिषदेत हाके म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील साहित्य खरेदीबाबत यापूर्वी कधीही एवढ्या जाहीरपणे चर्चा करण्यात आली नव्हती़ युपीएच्या दहा वर्षांच्या काळात राफेल खरेदीबाबत केवळ चर्चाच करण्यात आल्या़ संरक्षण साहित्यासाठी एकतर समोरील देशाशी करार करण्यात येतो किंवा दलालामार्फत ती खरेदी करण्यात येते़ युपीएने दहा वर्षे दलालासोबत चर्चा करुनही त्याची खरेदी केली नाही़ मात्र मोदी सरकारने संरक्षणाला प्राधान्य देत राफेलसाठी त्या देशाशी करार केला़कारगिलच्या युद्धानंतरच उच्च क्षमतेची लढाऊ विमाने खरेदी करण्याची गरज संरक्षण दलांनी व्यक्त केली होती़ त्यामुळे या विषयाला मोदी सरकारने गंभीरतेने घेतले़ सर्व प्रक्रिया करुनच राफेलची खरेदी करण्यात आली आहे़ त्यासाठी अंबानीच्या रिलायन्स कंपनीची दसॉल्टने निवड केली आहे़ त्याचबरोबर अन्य ३० कंपन्यांसोबतही दसॉल्टने करार केला आहे़ त्यामुळे अंबानीला फायदा पोहोचविला हे म्हणणे चूक आहे़या विषयात न्यायालयाने काँग्रेसला चपराक लगावल्यानंतरही काँग्रेसकडून या विषयाचे भांडवल करण्यात येत आहे़ असा आरोपही हाके यांनी केला़ यावेळी हाके यांनी इतर विषयांवर बोलण्यास नकार देत फक्त राफेलच्या मुद्यावर बोलण्याची विनंती केली़ यावेळी आ़ राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, व्यंकटेश साठे यांची उपस्थिती होती़ग्रामपंचायत पातळीवर पत्रपरिषद घेण्याची गरजराफेलसारख्या राष्ट्रीय विषयावर जिल्हा पातळीवर पत्रपरिषद घेण्याची काय गरज ? असा प्रश्न हाके यांच्यासमोर उपस्थित केला असताना ते म्हणाले, काँग्रेसने या विषयावरुन लोकांची दिशाभूल सुरु केली आहे़ त्यामुळे जिल्हापातळीवर नाहीतर प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पत्रपरिषद घेवून जनतेला हा विषय समजावून सांगण्याची गरज आहे़ कोणतीही गोष्ट वारंवार सांगितल्यास ती खरी वाटू लागते़ असेही हाके म्हणाले़काँग्रेसविरोधात तक्रार करणारकाँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले़ या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधानिक पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अर्वाच्च भाषेत टीका केली़ या विरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे म्हणाले़सेनेची संस्कृती वेगळीपंढरपूर येथील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार ही चोर है’ असे वक्तव्य केले़ त्यावर हाके म्हणाले, शिवसेनेची संस्कृती भिन्न आहे़ तो स्वतंत्र पक्ष आहे़ त्यांना जे वाटते ते मत त्यांनी मांडलं़ त्यामुळे शिवसेनेचं काय करायचं हे आम्ही पाहून घेवू़ त्यांच्या विधानाला एवढे महत्त्व देण्याची गरजही नसल्याचे हाके म्हणाले़
राफेलच्या आरोपामुळे भाजपा बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:06 AM
मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप होत होते़ या आरोपांची उत्तरे देताना काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून आले होते़ नेमकी तशीच परिस्थिती आता भाजपाची झाली आहे़
ठळक मुद्देप्रदेश प्रवक्ते नांदेडमध्ये : सोमवारच्या काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपाची पत्रकार परिषद