नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थिनींकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली जात असल्याचे उघडकीस आले आहे़ स्नेहसंमेलनाची तयारी आटोपल्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत प्रथम वर्षांच्या मुलींना वसतिगृहात उभे राहण्यास सांगण्यात येत आहे़ गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे़ परंतु याबाबत कुठलीही तक्रार आली नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे़
वैद्यकीय महाविद्यालयात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे़ येत्या काही दिवसांत महाविद्यालयात स्नेहसंमेलन घेण्यात येणार आहे़ त्यासाठी ग्रंथालयाच्या वरील मजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तयारी करीत आहेत़ रात्री अकरा वाजेनंतर ते सर्व जण आपापल्या वसतिगृहात परत जातात़ परंतु गेल्या चार दिवसांपासून वसतिगृहात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना रात्री तीन वाजेपर्यंत उभे करुन ठेवण्यात येत आहे़, अशी माहिती हाती आली आहे़ वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या त्रासाची एका विद्यार्थिनीने तक्रारही केली होती़ परंतु तिची समजूत घालण्यात आल्याचे समजते़या प्रकाराची चौकशी करणार सध्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरु आहे़ ग्रंथालयाच्या वरील भागात विद्यार्थी तयारी करीत आहेत़ त्यानंतर रात्री अकरा वाजता ते वसतिगृहात परत जातात़ परंतु वसतिगृहात असा काही प्रकार होत असेल असे वाटत नाही़ अद्याप तरी तशी तक्रार नाही़ परंतु वसतिगृहातील मुलींशी बोलून चौकशी करणार आहे़ - डॉ़ एस़ आऱ वाकोडे, प्रभारी अधिष्ठाता
स्नेहसंमेलनाची तयारी सुरु आहे़ रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थी सराव करतात़ वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार झाला नाही़ तुम्हाला माहिती कोणी दिली? रॅगिंग होत असल्यास मुलींनी माझ्याकडे तक्रार केली असती़- सुधा कानखेडकर, वॉर्डन