शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 11:36 PM2022-11-07T23:36:11+5:302022-11-07T23:43:46+5:30
७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली
देगलूर (जि. नांदेड) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एवढ्या उशिरापर्यंत आपण माझे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा सरळ ठरल्याप्रमाणे श्रीनगर येथे जाऊनच थांबेल. त्याला कोणतीही शक्ती अथवा आंधी, तुफान रोखू शकत नाही, असे खासदार राहुल गांधी यांनी देगलूरमध्ये उपस्थितांना मागदर्शन करताना केले.
७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून खासदार राहुल गांधी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील जनतेविषयी, सामान्यांविषयी असलेली नफरत, क्रोध संपवायचा आहे, बंधुभाव वाढवायचा आहे. यात्रेत आम्ही कुठल्याही प्रकारची भाषणबाजी करीत नाहीत. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या पदयात्रेत व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, मजूर, गोरगरीब, कष्टकरी आम्हाला भेटून संवाद साधतात. त्या सर्वांसाठी आमच्या मनाचे दरवाजे आणि दिल खुले आहे. संवादातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
जीएसटी आणि नोटाबंदीमध्ये छोटे व्यापारी संपुष्टात आले. बेरोजगारी वाढली. सामान्यांसह व्यापारी परेशान आहेत. आता कोणीही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारी आणि महागाईवर आज बोलायला तयार नाहीत. गॅसचे दर वाढले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठे गेले, यावर मोदी काहीच बोलत नाहीत. हा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सुख-दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही पदयात्रेत सर्वांशी संवाद साधतोय. मला अभिमान वाटतो की, महाराष्ट्रातील यात्रा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने सुरू झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या पदयात्रेला सुरुवात होत असल्याचा अभिमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले.