नांदेड : आॅनलाईन जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणक, सीपीयुची विक्री केल्या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या उपकरणांच्या सहाय्याने बादशहा नावाचा आॅनलाईन जुगार चालवला जात असे.
शहरातील वजिराबाद भागातील आॅनलाईन सर्व्हीस सेंटर या दुकानात विना परवाना बादशहा नावाचा गेम आॅनलाईन मटका चालवला जात होता. याद्वारे लोकांना जास्त पैशाची आमिष दाखवून लुबाडण्यात येत होते. या प्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी वजिराबाद पोलिसांनी मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात असलेल्या आॅनलाईन सर्व्हीस सेंटर या दुकानावर धाड टाकली. यावेळी १७ सीपीयु जप्त करण्यात आले. या सीपीयुमध्ये सॉप्टवेअरद्वारे विविध भागात आॅनलाईन लॉटरी चालवली जात होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किरण पठारे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आॅनलाईन लॉटरीचा बंदोबस्त करु- जाधवशहरात सुरू असलेल्या मटका अड्डे बंद करण्यासाठी पोलिस सरसावले आहेत. मागील चार दिवसापासून अवैध धंद्यावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. शहरात आॅनलाईन लॉटरी पद्धतीने जुगार चालविला जात आहे. याबाबतची तांत्रिक माहिती घेण्यात आली असून बुधवारी पोलिसांनी धाड टाकून वजिराबाद भागातील एका दुकानातून १७ आॅनलाईन मशिन जप्त केल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. या दुकानाला सील करण्यात आले आहे. आॅनलाईन लॉटरी पद्धतीची तांत्रिक माहिती घेवून कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे.