नांदेड : कोरोना महामारीमुळे भारत सरकारच्या आदेशान्वये दिनांक २२ मार्चपासून इतर रेल्वे आरक्षण केंद्रांसोबतच सचखंड गुरुद्वारा, नांदेडमधील रेल्वे आरक्षण केंद्रही बंद करण्यात आले होते. दिनांक ८ जानेवारीपासून हे केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षकांनी हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी दिनांक ६ जानेवारी रोजी केली होती. यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जी. चंद्रशेखर यांना त्वरित सूचना देत हे आरक्षण केंद्र शुक्रवार, ८ जानेवारीपासून पुन्हा सुरु केले. याबद्दल गुरुद्वारा बोर्डातर्फे रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. सचखंड गुरुद्वारा परिसरात सुरु करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.