- संतोष गाढे मुदखेड (जि. नांदेड) : तालुक्यातील सीता नदीला पूर आला असून पाण्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकल स्वार पुराच्या प्रवाहात अडकला असून जीव वाचविण्यासाठी झाडाचा आसरा घेतला आहे सदर घटनास्थळी प्रशासन दाखल झाले आहे.
सोमवार व मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मुदखेड तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे .मुदखेड ते नांदेड रस्त्याने प्रवास करणारे दोघेजण (इजळी फाटा परिसरात) सीता नदीच्या पुलावरून मोटरसायकलने जात असता पाण्याचा अंदाज न आल्याने मोटार सायकल सह पुराच्या प्रवाहात दीपक शर्मा, मुदखेड व सावळा शिंदे, बारड हे दोघेजण वाहून जात होते. सदर घटना मंगळवार दि.१२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. जीव वाचविण्यासाठी दोघांनी एका झाडाचा सहारा घेतला. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हाधिकारी डाॅ.विपिन इटनकर,उपविभागीय अधिकारी डाॅ.राजेंद्र कंधारे,तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार संजय नागमवाड,मंडळाधिकारी हायुन पठाण, तलाठी अनिरुद्ध जोंधळे,प्रवीण होंडे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा व पोलीस कर्मचारी हे रात्रभर तळ ठोकून होते. दोघांनीही जीव वाचवण्यासाठी रात्र झाडावरच काढली.
सदर घटनेतील दोघांना वाचविण्यासाठी एसडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते मंगळवारी रात्री साडेनऊ ते सकाळी साडेनऊ या बारा तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनला अखेर यश मिळाले असून जिल्हा प्रशासनामुळे दोघांना जीवदान मिळाले. असून सर्व स्तरातून याचे कौतुक होत आहे.